महत्वाच्या बातम्या

 जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत २ हजार ९७४ कोटींचे करार


- उद्योजकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
- ७ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यामध्ये उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीला चालना देऊन रोजगार निर्मिती होण्यासाठी प्रथमच जिल्हा गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले. या गुंतवणूक परिषदेत उद्योजकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत राज्य शासनासोबत तब्बल २ हजार ९७४ कोटींचे करार केले असून ७ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत.

चरखा गृह येथे जिल्हा गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली होती. गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उद्यमी महाराष्ट्रचे संस्थापक ओंकार हरी माळी, वस्त्रोद्योग मंत्रालयाचे राजेश साटम, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक कमलेशकुमार जैन, जिल्हा अग्रणी प्रबंधक चेतन शिरभाते यांच्यासह उद्योजक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी स्टॉलचे सुध्दा उद्घाटन केले.

आमदार डॉ. भोयर म्हणाले, जिल्ह्यामध्ये उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण आहे. समृध्दी महामार्ग उद्योग वाढीसाठी महत्वाचा ठरणार आहे. उत्पादीत वस्तुंचे मार्केटिंग, उत्तम पॅकेजिंग करणे गरजेचे आहे. मोठ्या उद्योगांसोबत लघू उद्योगसुध्दा महत्वाचे असून छोटे छोटे कुटुंब त्यासोबत जोडले गेले आहेत. येणाऱ्या काळात वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले, भौगोलिक दृष्ट्या देशाच्या केंद्रस्थानी वर्धा जिल्हा आहे. टेक्सटाईल उद्योगासाठी जिल्ह्यात पोषक वातावरण आहे. राष्ट्रीय महामार्ग, समृध्दी महामार्ग, ड्रायपोर्ट, रेल्वेची सुविधा अशा उद्योगांच्या दृष्टीने आवश्यक दळवळणांची साधने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून जागा, मुबलक पाणी व वीज आदी सुविधा उपलब्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच नवउद्योजकांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जिल्ह्याला ४०० कोटींचे उद्दीष्ट असतांना मोठ्या प्रमाणात उद्योग केंद्राच्या माध्यमातून गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले, त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

जिल्हास्तरावर गुंतवणूक आकर्षित करणे, जिल्ह्यांना विकासाचा केंद्र मानून जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासाला चालना देणे तसेच गुंतवणूकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उलपब्ध करुन देण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली असल्याचे महाव्यवस्थापक कमलेशकुमार जैन यांनी यावेळी सांगितले. यावेळी उद्योजकांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले.

१०० कोटींच्यावर गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये एसएमडब्ल्यु इसपाट प्रा.लि. यांनी ८०० कोटी, इवोनिथ स्टील प्रा. लि. ६५० कोटी, गामा टेक्स प्रा. लि. ५१० कोटी, पी. व्ही, टेक्स्टाईल १५० कोटी, अरियंका स्पिनटेक्स १२० कोटी, बोथरा कॉटस्पीन प्रा. लि. १०० कोटी तसेच विशन बायो-सायन्स प्रा.लि. १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. परिषदेमध्ये जिल्ह्यातील उत्पादीत केलेल्या विविध वस्तुंचे स्टॉल लावण्यात आले होते.

  Print


News - Wardha
Related Photos