महत्वाच्या बातम्या

 प्रधानमंत्री पिकविमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : रब्बी हंगाम सन २०२५ करिता प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेत देवळी तालुक्यातील कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी १५ डिसेंबर पर्यंत विमा हप्ता भरुन सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक असणार आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी अँग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक असणे बंधनकारक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याची व विमा हप्ता कर्ज रक्कमेतून कपात न करण्यासाठी बँकेला ८ डिसेंबर पर्यंत सूचना द्यावी. वर्धा जिल्ह्याकरीता अँग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. देवळी तालुक्यात गहू बागायत व हरभरा या पिकासाठी अधिसूचित करण्यात आले आहे. गहू बागायत पिकासाठी विमा हप्ता ३३० रुपये, हरभरा पिकासाठी विमा हप्ता ३६० रुपये शेतकऱ्याला भरावा लागणार आहे.

पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पिक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबींमुळे हंगामाच्या शेवटी पिक कापणी आधारे, तांत्रिक उत्पादन आधारे महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरुन नुकसान भरपाई देय राहील. प्रतिकुल हवामान घटकामुळे पेरणी, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकुल परिस्थिती व काढणी पश्चात नुकसान भरपाई यासारखे अतिरिक्त संरक्षण रब्बी हंमागासाठी लागू राहणार नाही.

देवळी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्याकरीता आपल्या जवळच्या बँक शाखेत तसेच आपले सेवा केंद्रामध्ये विहीत मुदतीत विमा हप्ता भरुन सहभागी व्हावे, असे आवाहन तहसिलदार देवळी यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos