महत्वाच्या बातम्या

 जागतिक हिवताप दिनानिमित्य विविध जनजागृती कार्यक्रम


- नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : जागतिक आरोग्य संघटनेमार्फत २५ एप्रिल हा दिवस दरवर्षी जागतिक हिवताप दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. हिवताप विषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन प्रतिरोध उपायोजनेच्या अंमलबजावणीत नागरिकांचा सक्रीय सहभाग प्राप्त करुन घेण्यासाठी विविध उपक्रमांनी जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात येतो.

हिवताप संपविण्यासाठी हिवताप कार्यालयाच्यावतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. हिवतापसदृष्य  तापाची विविध पध्दतीने तपासणी करुन तेथील डास नष्ट करुन विविध साधनांचा वापर केल्या जातो. तरी हिवतापाला पुर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी आपण कमी पडत आहे. याकरीता जागतिक हिवताप दिनाच्या  यावर्षीच्या घोषवाक्यानुसार शुन्य मलेरिया वितरीत करण्याची वेळ : गुंतवणूक करा नवीन करा अंमलबजावणी करा अशा यावर्षीच्या जागतिक हिवताप दिनाच्या संकल्पनाचा वापर करुन रोगाचा प्रसार कमी करण्यासाठी  प्रत्येकाने सहभाग घेतला पाहिजे. हिवतापावर मात करावयाचे असेल तर शासकीय यंत्रणेसोबतच नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.

हिवताप विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र, उप केंद्र, गावस्तरावर शासकीय व सामाजिक संस्थाच्या सहकार्याने एक दिवस एक कार्यक्रम असा उपक्रम राबवून त्यानुसार व्हीएचएनएससी सभा, रॅली, पंचायत राज सदस्यांची सभा, जलद ताप रुग्ण सर्वेक्षण इत्यादी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत डासांमार्फत प्रसारीत होणाऱ्या हिवताप, हत्तीरोग, चिकनगुनिया, डेंगु व जापनिज एन्सेफेलायटीस या वेगवेगळया आजाराचा प्रचार प्रसार होत असतो. डासापासून होणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी  हिवताप नियंत्रण ही एकट्या शासनाची जबाबदारी नसून ती प्रत्येकाची जबाबदारी  आहे. 

यासाठी प्रत्येकाने आपल्या जबाबदारीची जाणिव ठेवून घरासभोवतालचा परीसर स्वच्छ ठेवावा, परिसरात पाणी साचू देऊ नये, खड्डे बूजवावे, साचलेली गटारी वाहती करावी, छतावरील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकन लावावे, आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळावा, घरात किटकनाशक मच्छरदाणीचा वापर करावा,  जमिनीवरील टाक्या, डासोत्पत्ती स्थाने यामध्ये गप्पी मास्याचा वापर करावा. संडासचे व्हेटपाईपला घरगुती  कापड बांधावा व ताप आल्यास आरोग्य  कर्मचाऱ्यामार्फत रक्त नमुना  तपासून घ्यावा. 

गप्पी मासे पाळा व हिवताप टाळा या उक्तीप्रमाणे जैविक नियंत्रणाने व लोकसहभागाने हिवताप  आजारावर नियंत्रण ठेवणे हे माणसाच्या हातात आहे. त्यामुळे नागरिकांनी हिवतापावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्यासह आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos