अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

- नागपूर-कामठी महामार्गावरील साईबाबा कॉलनी परिसरातील घटना; अडीच वर्षांची मुलगी झाली पोरकी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कामठी : नागपूर-कामठी महामार्गावर भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने मोटरसायकलला मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळी न थांबता वाहनासह पळ काढला. ही घटना शनिवारी ३ ऑक्टोबर रात्री साडेअकराच्या सुमारास कामठी शहरालगतच्या साईबाबा कॉलनी परिसरात घडली.
अजय शेषराव वाडिवे ३० वर्षे रा. पवनी, ता. रामटेक असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अजय हे नागपूर शहरातील एका व्यक्तीकडे ट्रकचालक म्हणून काम करीत होते. कामानिमित्त ते कामठी शहरातील हमालपुरा परिसरात भाड्याने राहत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय यांनी शनिवारी दिवसभर ट्रकचालक म्हणून काम केले. काम आटोपल्यानंतर त्यांनी ट्रक नागपूर शहरात मालकाकडे सोडला. त्यानंतर ते स्वतःच्या एमएच-४०/सीएल-२३०५ क्रमांकाच्या मोटरसायकलने एकटेच नागपूरहून कामठीला आपल्या घरी जाण्यासाठी निघाले होते.
दरम्यान, नागपूर-कामठी महामार्गावरील साईबाबा कॉलनी परिसरात मागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की, अजय गंभीर जखमी झाले. मात्र, अपघातानंतर अज्ञात वाहनचालकाने वाहन न थांबविता घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर दुखापतीमुळे अजय यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर कामठी (जुनी) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून अजय यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. अजय यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अजय हे विवाहित असून त्यांच्या पश्चात पत्नी, वृद्ध आई, भाऊ आणि अवघी अडीच वर्षांची मुलगी आहे. वडिलांचा अचानक मृत्यू झाल्याने चिमुकली मुलगी कायमची पोरकी झाली आहे.
सीसीटीव्हीच्या आधारे वाहनाचा शोध -
अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी कामठी (जुनी) पोलिसांनी तपास सुरू केला आहे. महामार्गावरील तसेच परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून, अपघाताच्या वेळी त्या मार्गावरून गेलेल्या वाहनांची माहिती घेतली जात आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे धडक देणाऱ्या वाहनाचा आणि चालकाचा शोध घेण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.
याप्रकरणी अजय यांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून कामठी (जुनी) पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०६ व २८१ तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार विजय दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल मधकर निखाडे या अपघाताचा पुढील तपास करीत आहेत.




Petrol Price




