महत्वाच्या बातम्या

 स्वस्त आणि सुरक्षित प्रवासासाठी एसटी महामंडळाची नवीन बसेस शालेय सहलीसाठी उपलब्ध


विदर्भ न्युज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : राज्यातील शाळा-महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी एसटी महामंडळाने यंदा नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. शालेय सहली विद्यार्थ्यांसाठी एक संस्मरणीय अनुभव असतो आणि यंदा देखील एसटी महामंडळ विद्यार्थ्यांना त्यांच्या एकूण भाड्याच्या ५०% सवलतीसह या सहलींचा आनंद घेण्याची संधी देत आहे.

प्रत्येक शालेय सहलीला आकर्षक व किफायतशीर बनवण्यासाठी राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांना विशेष सहलींचा लाभ देण्याचे सुनिश्चित केले आहे.

मंत्री सरनाईक यांच्या मते, राज्यभरातील एसटीच्या २५१ आगारांमधून दररोज ८०० ते १००० बसेस शाळा-महाविद्यालयांना सहलीसाठी उपलब्ध करून दिल्या जातील. यावर्षीची विशेष बाब म्हणजे एसटी महामंडळाने विद्यार्थ्यांसाठी स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव देण्याच्या दृष्टीने नवीन बसेस सुरू केली आहेत.

गेल्या वर्षी, नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान एसटी महामंडळाने १९,६२४ बसेस शालेय सहलीसाठी उपलब्ध केल्या होत्या. या माध्यमातून एसटी महामंडळाला ९२ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. यंदा देखील प्रत्येक आगारप्रमुख आणि स्थानकप्रमुख शालेय सहलींचे आयोजन करण्यासाठी शाळा- महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांशी संवाद साधत आहेत.

या सहलींचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय अभ्यासक्रमातील विविध विषयांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी एक उत्तम संधी प्रदान करणे आहे.





  Print






News - Rajy




Related Photos