खड्ड्यांनी जर्जर चामोर्शी मार्गावर ‘फसली रे फसली’


- रापमची बस फसल्याने वाहनांच्या लागल्या रांगा
- नागरिकांनी व्यक्त केला तिव्र संताप
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
अजय कुकडकर  / गडचिरोली :
शहरातील रस्त्यांची सध्या वाट लागली आहे. चामोर्शी मार्ग तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशीच परिस्थिती आहे. मागील अनेक वर्षांच्या कालावधीत यावर्षी सर्वाधिक खड्डे रस्त्यांवर दिसून येत असून वाहनधारकांची त्रेधातिरपीट उडत आहे. आता तर चक्क वाहने फसायला लागली असून आज २८ आॅगस्ट रोजी सायंकाळी ७  वाजताच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाची बस रस्त्यावरील खड्ड्यात फसली. यामुळे वाहतूक खोळंबली आहे.
एमएच ०७ सी ९०८३  क्रमांकाची गडचिरोली आगाराची बस चामोर्शीवरून गडचिरोलीकडे येत होती. दरम्यान बस चामोर्शी मार्गावरील वीर बाबुराव शेडमाके चौकाजवळ येताच खड्ड्यात फसली. अनेक प्रयत्न करूनही बस निघेना. यामुळे बसच्या मागे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. इंदिरा गांधी चौकापासून तर शासकीय विज्ञान महाविद्यालयापर्यंतचा रस्ता मोठ मोठ्या खड्ड्यांनी व्यापून टाकला आहे. या खड्ड्यांमध्ये काही दिवसांपूर्वी मुरूमाचा लेप लावण्यात आला. यामुळे पावसामुळे प्रचंड चिखल निर्माण झाला. या मार्गावरून नेहमीच अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. यामुळे खड्ड्यांमधील मुरूमसुध्दा निघून गेले आणि आणखी खड्ड्यांचा आकार वाढतच चालला आहे. यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेवूनच प्रवास करावा लागत आहे. 
बस फसल्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांची प्रचंड मोठी रांग लागली. अनेक वाहने खोळंबून पडली. यामुळे नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. या मार्गावर केव्हाही वाहने फसण्याचा आणि अपघात होण्याचा धोका बळावला आहे. यामुळे ‘रस्ते झाले मरणाला स्वस्ते’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे. 
मोठा पाऊस आल्यास चामोर्शी मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते. शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असते. यामुळे मोठी वाहनेसुध्दा जावू शकत नाहीत. भाजपा कार्यालयापासून तर डाक कार्यालयापर्यंतच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. मात्र या रस्त्यांच्या दुरवस्थेकडे कोण लक्ष देईल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-28


Related Photos