लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजणार : आयोगाकडून उद्या घोषणा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजणार असून शनिवारी १६ मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोग घोषणा करणार आहे. निवडणूक आयोगाने दुपारी ३ वाजता या संदर्भात पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकीची वेळापत्रक जाहीर केले जाईल.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेचे आयोगाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून याचे लाईव्ह स्ट्रिमिंग केले जाईल. निवडणुकीची घोषणा होताच देशभरात आचारसंहिता लागेल. सूत्रांच्या माहितीनुसार, सात ते आठ टप्प्यांमध्ये लोकसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तडकाफडकी राजीनामा दिला होता. तर निवडणूक आयुक्तांचे एक पद आधीच रिक्त आहे. या दोन्ही पदांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने माजी सनदी अधिकारी सुखबीर सिंह संधू आणि ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती केली. त्यानंतर शुक्रवारी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. जवळपास ४५ मिनिटे ही बैठक सुरू होती. या बैठकीनंतर शनिवारी दुपारी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले.
दरम्यान, २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक सात टप्प्यांमध्ये झाली होती. १० मार्च रोजी निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केली होती. ११ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील तर १९ मे रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले होते, तर २३ मे रोजी निकाल लागला होता. त्यावेळी देशभरात ९७ कोटी मतदार होते आणि यापैकी ६७ टक्के मतदारांना मतदान केले होते.
News - World