महत्वाच्या बातम्या

 भामरागड रेस्ट हाऊस परिसरात अस्वलाचे दर्शन : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा!


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : भामरागड येथील वनविभागाच्या रेस्ट हाऊस परिसरात आज अस्वलाचे दर्शन झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मानवी वर्दळ असलेल्या परिसरात अस्वल दिसून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वनविभागाकडून सतर्कतेचे आवाहन करण्यात येत आहे. विशेषतः सकाळच्या वेळेत मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांनी पुढील दोन ते चार दिवस विशेष खबरदारी घ्यावी. शक्यतो या कालावधीत सकाळी फिरायला जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे. दररोज सकाळी व्यायामासाठी किंवा फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी काही दिवस आपल्या नियमित दिनक्रमात बदल करणे आवश्यक आहे.

लहान मुलांना एकटे बाहेर पाठवू नका! -

रेस्ट हाऊस परिसरासह आजूबाजूच्या भागात ये-जा करणाऱ्या नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगावी. पालकांनी आपल्या लहान मुलांना घराबाहेर एकटे पाठवू नये. तसेच नागरिकांनी एकट्याने निर्जन भागात जाणे टाळावे. परिसरात अस्वल दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा, फोटो किंवा व्हिडिओ काढण्याचा अथवा त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करू नये. अशा प्रकारचे धाडस धोकादायक ठरू शकते.

अस्वल दिसल्यास वनविभागाला तात्काळ कळवा! -

अस्वल पुन्हा दिसून आल्यास नागरिकांनी घाबरून जाऊन आरडाओरड किंवा गर्दी न करता सुरक्षित अंतर राखावे आणि तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी. वन्यप्राण्यांना त्रास होईल किंवा त्यांच्या हालचालींमध्ये अडथळा निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करू नये. भामरागड परिसरात अस्वलाचे दर्शन झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांनी विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे. वन्यप्राण्यांच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून वनविभागाच्या सूचनांचे पालन करावे. घाबरून न जाता सावधगिरी बाळगणे हाच सध्या सुरक्षिततेचा महत्त्वाचा उपाय ठरणार आहे.






  Print






Related Photos