आठ रुपयांत बालकांचे पोषण कसे करणार


- आठ महिन्यांपासून महिला बचत गटांची देयके थकीत; वाढत्या महागाईमुळे अंगणवाडी पोषण आहार योजनेवर संकट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : खाद्यपदार्थांच्या किमती सातत्याने वाढत असताना अंगणवाडीतील बालकांना नाश्ता आणि गरम पोषण आहार पुरविणाऱ्या महिला बचत गटांना प्रतिबालक अवघे आठ रुपये दिले जात आहेत. त्यातच बचत गटांनी पुरविलेल्या आहाराची देयके तब्बल आठ महिन्यांपासून थकीत असल्याने बालकांच्या पोषणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलांचीच आर्थिक कोंडी झाली आहे. वाढता खर्च, अपुरी रक्कम आणि थकीत बिले यामुळे अंगणवाडीतील पोषण आहार व्यवस्था चालविताना बचत गटांची दमछाक होत आहे.
नागपूर शहरातील जवळपास २०० महिला बचत गट अंगणवाड्यांमधील बालकांना नाश्ता आणि गरम पोषण आहार पुरवितात. एका बचत गटाकडे साधारण चार ते पाच अंगणवाड्यांची जबाबदारी असते. त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने बालकांसाठी आहार तयार करून तो वेळेत पोहोचविण्याचे काम या बचत गटांना करावे लागते. मात्र, त्यासाठी मिळणारी रक्कम आणि प्रत्यक्षात होणारा खर्च यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे.
५०० किलो कॅलरी उष्मांक, १२ ते १५ ग्रॅम प्रथिनांचे उद्दिष्ट -
अंगणवाडीतील बालकांना दररोज सुमारे ५०० किलो कॅलरी उष्मांक आणि १२ ते १५ ग्रॅम प्रथिने मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी आहारात विविध पौष्टिक पदार्थांचा समावेश करण्याचे नियोजन आहे. मुरमुरा लाडू, गूळ-शेंगदाणा चिक्की, राजगिरा चिक्की, नाचणीचे लाडू, डाळीची खिचडी, मटकीची उसळ, गव्हाची लापशी, व्हेज पुलाव, उपमा आदी पदार्थ बालकांना देण्यात येतात.
बालकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले पोषणमूल्य या आहारातून मिळावे, हा या योजनेचा उद्देश आहे. मात्र बाजारातील वाढलेल्या दरांचा विचार करता केवळ आठ रुपयांत हा दर्जेदार आणि पोषणमूल्यपूर्ण आहार तयार करणे बचत गटांसाठी दिवसेंदिवस कठीण होत आहे.
खाद्यतेल २०० रुपये लिटर, शेंगदाणा २०० रुपये किलो -
सध्या खाद्यतेलाचे दर १८० ते २०० रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहेत. शेंगदाण्याचा दर सुमारे २०० रुपये किलो, गुळाचा दर ८० रुपये किलो, तर फुटाण्याचा दर सुमारे १५० रुपये किलो आहे. याशिवाय डाळी, धान्य, मसाले, भाजीपाला, इंधन, स्वयंपाकाचा खर्च आणि आहाराच्या वाहतुकीचा खर्चही बचत गटांनाच करावा लागतो.या सर्व खर्चाचा विचार करता प्रतिबालक आठ रुपयांच्या रकमेत अपेक्षित पोषणमूल्याचा आहार देणे अवघड झाले आहे. दर वाढत असताना आहारासाठी मिळणारी रक्कम मात्र वाढत नसल्याने बचत गटांना स्वतच्या खिशातून अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याचे सांगण्यात येते.
टीएचआर पुरवठादारांना अग्रीम बचत गटांना आठ महिन्यांपासून प्रतीक्षा -
अंगणवाडीतील लाभार्थ्यांना गरम पोषण आहारासोबत टीएचआर अर्थात टेक होम रेशन दिले जाते. टीएचआर वितरणात यापूर्वी गैरप्रकाराच्या घटना समोर आल्याचा दावा बचत गटांकडून करण्यात आला आहे. असे असतानाही संबंधित पुरवठादारांना अग्रीम देयके दिली जात असल्याचा आरोप बचत गटांनी केला आहे.दुसरीकडे, प्रत्यक्ष अंगणवाडीतील बालकांसाठी दररोज नाश्ता आणि गरम पोषण आहार तयार करून देणाऱ्या बचत गटांची बिले मात्र आठ महिन्यांपासून थकीत आहेत. त्यामुळे देयके देताना प्रशासनाकडून दुजाभाव केला जात आहे का, असा सवालही बचत गटांकडून उपस्थित केला जात आहे.
उधारी आणि व्याजाने पैसे घेऊन पोषण आहार -
देयके वेळेत मिळत नसल्याने कच्चा माल, भाजीपाला आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी बचत गटांना उधारीचा आधार घ्यावा लागत आहे. काही वेळा व्याजाने पैसे घेऊन आहाराचा खर्च भागवावा लागत असल्याचे संचालिकांचे म्हणणे आहे.आठ रुपयांत बालकांचे पोषण करायचे आणि त्यातही आठ महिन्यांपासून देयके थकीत ठेवायची, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे उधारी आणि व्याजाने पैसे घेऊन अंगणवाड्यांचा कारभार सुरू ठेवावा लागत आहे, अशी व्यथा बचत गट संचालिका शालिनी साळवे यांनी व्यक्त केली.
घरभाडे भत्तेही वर्षभरापासून रखडले -
पोषण आहाराच्या देयकांसोबतच अंगणवाड्यांच्या घरभाडे भत्त्यांचाही प्रश्न गंभीर असल्याचे बचत गटांकडून सांगण्यात आले. घरभाड्याचे भत्तेही वर्षभरापासून मिळाले नसल्याने आर्थिक भार आणखी वाढला आहे.बचत गटांची देयके आठ महिन्यांपासून थकीत आहेत. अंगणवाड्यांचे घरभाडे भत्तेही वर्षभरापासून मिळालेले नाहीत. आमच्यावर पोषण आहार बंद करण्याची वेळ आली आहे. तपासण्या वाढल्या मात्र थकीत देयके देण्यासाठी कुणी पुढे येत नाही, अशी नाराजी शालिनी साळवे यांनी व्यक्त केली.
महागाईचा फटका, पोषणाचा प्रश्न ऐरणीवर -
अंगणवाडीतील बालकांना सकस आहार देणे ही शासनाच्या पोषणविषयक योजनांची महत्त्वाची बाब आहे. मात्र महागाईच्या तुलनेत उपलब्ध निधी अपुरा ठरत असेल आणि त्यातही बचत गटांची देयके महिनोनमहिने रखडत असतील, तर या योजनेच्या अंमलबजावणीवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे प्रतिबालक आहारासाठी मिळणाऱ्या रकमेत वाढ करावी, बाजारभावानुसार निधीचे पुनर्निर्धारण करावे आणि आठ महिन्यांपासून थकीत असलेली सर्व देयके तातडीने अदा करावीत, अशी मागणी महिला बचत गटांकडून होत आहे. अन्यथा आर्थिक अडचणींमुळे पोषण आहार पुरवठा सुरू ठेवणे कठीण होईल, असा इशाराही बचत गटांनी दिला आहे.




Petrol Price




