पुरात अडकलेल्या ‘त्या’ बसचे चालक - वाहक निलंबित


- पुरात बस वाहून गेल्याने गेला असता २५ प्रवाशांचा जीव 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
२० आॅगस्ट रोजी हैद्राबाद - गडचिरोली ही बस सिरोंचा - आलापल्ली मार्गावरील नंदीगाव नाल्याच्या पुरात अडकली होती. यामध्ये तब्बल २५ प्रवासी अडकून पडले होते. ग्रामस्थांच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले. या अपघातास कारणीभूत ठरलेल्या चालक व वाहकास राज्य परिवहन महामंडळाने निलंबित केले आहे. दोघांचीही चौकशी सुरू करण्यात आली असून चौकशी अंती दोषी आढळल्यास बडतर्फ केले जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 
एमएच १४ बिटी ५०८४ ही बस १९ आॅगस्ट रोजी गडचिरोलीहून हैद्राबाद ला गेली. २० आॅगस्ट रोजी परत येत असताना नंदीगाव नाल्यावरून पाणी वाहत होते. बस पुलावरून टाकल्यानंतर वाहून जावू लागली. मात्र लगतच्या झाडाला बस अडकल्यामुळे अडकून पडली होती. बसमध्ये यावेळी २५ प्रवासी होते. जवळपासच्या गावातील युवकांनी आपल्या प्राणाची बाजी लावून प्रवाशांना बाहेर काढले होते. यामुळे मोठा अनर्थ टळला होता. या प्रकरणाची राज्य परिवहन महामंडळाने गंभीर दखल घेत चालक व वाहकास निलंबित केले. सक्षम प्राधिकारी, विभागीय वाहतूक अधिकारी यांच्यामार्फत चौकशी  करून अहवाल तयार करण्यात येणार आहे. यात दोषी आढळून आल्यास चालक आणि वाहकाला निलंबित करण्यात येणार आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-03


Related Photos