महत्वाच्या बातम्या

 माजरी पोलिसांची गोवंश तस्करीवर कारवाई : चार गोवंशांची सुटका, ७.८६ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : कत्तलीच्या उद्देशाने चार गोवंश जनावरांची निर्दयतेने वाहतूक करणाऱ्या तिघांना माजरी पोलिसांनी पकडले. जय प्रमोद देठे (वय २१), रामकृष्ण मारोती भट (वय ४६) आणि अनुराग देवानंद कामटकर (वय १९, तिघेही रा. वणी परिसर, जि. यवतमाळ अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून चार गोवंश जनावरे, महिंद्रा बोलेरो मालवाहू वाहन आणि दोन मोबाईल फोन असा एकूण ७ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २५ ऑक्टोबर रोजी रात्री राळेगाव-पाटाळा मार्गावर करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, राळेगाव-पाटाळा मार्गावरून गोवंश जनावरांची अवैधरीत्या कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याची माहिती माजरी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्री जगन्नाथ बाबा मठासमोर नाकेबंदी केली. यावेळी रात्री सुमारे १०.२० वाजताच्या सुमारास महिंद्रा बोलेरो मालवाहू वाहन क्रमांक एमएच २९ बीई ९७२२ तेथे आले. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता, त्याच्या मागील भागात चार गोवंश जनावरे दोराने घट्ट बांधून निर्दयतेने कोंबून ठेवल्याचे आढळले. जनावरांसाठी चारा आणि पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती.

वाहनचालक जय देठे आणि त्याच्यासोबत वाहनाच्या केबिनमध्ये बसलेले रामकृष्ण भट व अनुराग कामटकर यांची पोलिसांनी चौकशी केली. यावेळी रामकृष्ण भट याने चार गोवंश जनावरे भरत खुसरे, रा. करंजी, ता. वरोरा, जि. चंद्रपूर याच्याकडून ६० हजार रुपयांना खरेदी केल्याचे सांगितले. मात्र, जनावरांच्या खरेदीसंदर्भातील कोणतेही बिल किंवा अन्य कागदपत्रे त्यांच्याकडे आढळून आली नाहीत.

या कारवाईत पोलिसांनी ६० हजार रुपये किमतीची चार जिवंत गोवंश जनावरे, सात लाख रुपये किमतीचे महिंद्रा बोलेरो मालवाहू वाहन, २५ हजार रुपये किमतीचा ॲपल आयफोन १३ आणि एक हजार रुपये किमतीचा जिओ भारत कार्बन मोबाईल फोन असा एकूण ७ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सुटका करण्यात आलेल्या गोवंश जनावरांना सुरक्षिततेच्या दृष्टीने चंद्रपूर येथील प्यार फाउंडेशनच्या गोशाळेत दाखल करण्यात आले. तसेच भद्रावती येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जनावरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६०, महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९७६ तसेच मोटार वाहन कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया करण्यात आली.

सदर कारवाई माजरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुबोध वंजारी यांचा नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक हरिदास चोपणे, धनराज पंचोडबरिया,  पोलीस हवालदार एकनाथ बोरकुटे, पोलीस अंमलदार उमेश उईके, चेतन मडावी यांनी केले.





  Print






Related Photos