केंद्रीय राखीव पोलिस दलातर्फे आंतरिक सुरक्षा पदकाचे वितरण


- आयईडी जागरूकता प्रशिक्षणाचा शुभारंभ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या वतीने आज ९ आॅगस्ट रोजी जवानांना आंतरिक सुरक्षा  पदक प्रदान करण्यात आले. तसेच अधिकारी आणि जवानांना अवयवदानाची प्रतीज्ञा देण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आयईडी जागरूकता प्रशिक्षणाचा शुभारंभसुध्दा करण्यात आला.
कार्यक्रमाला पोलिस महानिरीक्षक राज कुमार, पोलिस उपमहानिरीक्षक टी.सेकर, पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, सिआरपीएफच्या १९१ व्या बटालियनचे कमांडंट प्रभाकर त्रिपाठी, ९ व्या बटालियनचे कमांडंट  रविंद्र भगत, ११३ व्या बटालियनचे कमांडंट एन. शिवा. संकरे, ३७ व्या बटालियनचे कमांडंट राम मीणा, १९२ व्या बटालियनचे कमांडंट जिजाउ सिंह, अतिरिक्त अधीक्षक शैलेंद्र वलकोडे, द्वितीय कमांडंट दीपक कुमार साहु, द्वितीय कमांडंट कुलदीप सिंह खुराणा, टी.के. सोलंकी, अपर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलिस अधीक्षक बालाजी, उप कमांडंट कैलाश गंगवो तसेच सिआरपीएफचे अधिकारी उपस्थित होते. 
गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या पाच वाहिन्यांमधील १५ आणि महाराष्ट्र पोलिस दलातील १५ अशा ३० जवानांची आयईडी जागरूकता प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. जिल्हा नक्षलप्रभावीत असल्याने सिआरपीएफच्या पाचही बटालियन तसेच राज्य पोलिस दलाचे जवान रात्रंदिवस तैनात आहेत. नक्षलविरोधी अभियान राबविण्यासाठी जवानांना तयार करण्यात आले आहे. नक्षलविरोधी कार्य, सरकारी संपत्तीचे रक्षण तसेच जनतेच्या मनात पोलिस दलाप्रती विश्वास निर्माण करण्याचे कार्य हे जवान करीत आहेत. देशाच्या शारिरिक आर्थिक आणि मानसिक विकासात नक्षलवादामुळे खोडा निर्माण झाला आहे. 
नक्षलप्रभावित भागात काम करणाऱ्या  जवानांना आयईडी जनजागृती प्रशिक्षण मिळावे यासाठी पोलिस महानिरीक्षक राजकुमार, उपमहानिरीक्षक डाॅ. टी. सेकर, पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांनी अथक प्रयत्न केले होते. यामुळे जवानांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 
नक्षल्यांद्वारा आयईडी चा वापर करून मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. २०१२ मध्ये पुसटोला जवळ आयईडी ब्लाॅस्ट नक्षल्यांनी घडवून आणला होता. यामध्ये सिआरपीएफच्या जवानांना प्राण गमवावे लागले होते. तसेच कोटगुल येथेसुध्दा आयईडी ब्लाॅस्ट घडवून आणला होता. यावर्षीसुध्दा अनेक ठिकाणी नक्षल्यांनी आयईडी ब्लाॅस्ट घडवून आणले. यामुळे जवानांचे प्राण वाचविता यावे याकरीता आयईडी जागरूकता प्रशिक्षण दिले जाणार आहे. सदर प्रशिक्षण आज ९ आॅगस्टपासून १४ आॅगस्टपर्यंत दिले जाणार आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-09


Related Photos