महत्वाच्या बातम्या

 बालकांसाठी सांस अभियान ठरणार वरदान : न्यूमोनियावर शासकीय रुग्णालयांत मोफत उपचार


- फेब्रुवारी २०२७ पर्यंत विशेष मोहीम; वयोगटानुसार श्वासाच्या गतीवर लक्ष ठेवण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : देशातील एकूण बालमृत्यूंपैकी सुमारे १५ टक्के बालमृत्यू न्यूमोनियामुळे होत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. बालमृत्यूचे हे प्रमाण कमी करून न्यूमोनियामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागामार्फत ‘सांस’ (सोशल अवेअरनेस अँड अॅक्शन टू न्यूट्रलाइज न्यूमोनिया सक्सेसफुली) हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. फेब्रुवारी २०२७ अखेरपर्यंत चालणाऱ्या या अभियानांतर्गत न्यूमोनियाची लक्षणे वेळीच ओळखणे, तातडीने उपचार मिळवून देणे आणि शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार उपलब्ध करून देणे यावर भर दिला जाणार आहे.

जिल्ह्यातील बालमृत्यू दर कमी करण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विशेषतः पाच वर्षांखालील बालकांमध्ये न्यूमोनियाची लक्षणे वेळेत ओळखून योग्य उपचार सुरू केल्यास संभाव्य धोका टाळता येऊ शकतो. त्यामुळे पालकांनी बालकांच्या आरोग्याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

श्वास घेताना छाती आत ओढली जात असल्यास सावधान! -
बालकाला न्यूमोनियाची लागण झाल्यास श्वास घेताना छाती आत ओढली जाणे, वेगाने श्वास घेणे, धाप लागणे आणि सतत उलट्या होणे अशी लक्षणे दिसून येऊ शकतात. याशिवाय बालकाच्या प्रकृतीत असामान्य बदल जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. अशी लक्षणे आढळल्यास घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता बालकाला तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा शासकीय रुग्णालयात दाखल करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

वयोगटानुसार श्वासांची गती तपासणे आवश्यक -
न्यूमोनियाचे वेळीच निदान होण्यासाठी पालकांनी बालकाच्या वयानुसार एका मिनिटातील श्वासांची संख्या मोजणे महत्त्वाचे आहे. यासाठी आरोग्य विभागाने पुढीलप्रमाणे निकष सांगितले आहेत.  ० ते ५९ दिवस : नवजात बालकाने एका मिनिटात ६० किंवा त्यापेक्षा जास्त श्वास घेतल्यास, स्तनपान करता येत नसल्यास, शरीर थंड पडल्यास किंवा सुस्ती जाणवल्यास ही धोक्याची लक्षणे समजावीत. २ ते १२ महिने : बालकाने एका मिनिटात ५० पेक्षा जास्त श्वास घेतल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. १२ महिने ते ५ वर्षे : बालकाने एका मिनिटात ४० पेक्षा जास्त श्वास घेतल्यास वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. श्वासांची गती मोजताना बालक शांत अवस्थेत असणे आवश्यक आहे. वरील लक्षणे आढळल्यास विलंब न करता वैद्यकीय मदत घ्यावी. शासकीय रुग्णालयांमध्ये न्यूमोनियावरील उपचार मोफत उपलब्ध आहेत.

लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहन -
न्यूमोनियामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी पालकांचा सहभागही महत्त्वाचा आहे. बालकांमधील आजाराची लक्षणे वेळीच ओळखणे, तातडीने उपचार घेणे, नियमित लसीकरण पूर्ण करणे आणि आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच आशा स्वयंसेविकांमार्फत करण्यात येणाऱ्या गृहभेटींचा लाभ घेऊन बालकांच्या आरोग्याची नियमित तपासणी करून घ्यावी. न्यूमोनियाची लक्षणे वेळीच ओळखून तातडीने उपचार घेतल्यास बालकांचे प्राण वाचविणे शक्य आहे. त्यामुळे पालकांनी बालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. आशा स्वयंसेविकांच्या गृहभेटींचा लाभ घ्यावा आणि बालकांचे लसीकरण वेळेत पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी केले आहे.





  Print






Related Photos