महत्वाच्या बातम्या

 बल्लारपुरात निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थी निवडीत घोळ? पात्रतेबाबत प्रश्नचिन्ह


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल, निराधार आणि वृद्ध नागरिकांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने शासनाकडून संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना राबविण्यात येतात. मात्र, बल्लारपूर शहरात या योजनांच्या लाभार्थी निवडीवरून गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, खऱ्या गरजूंना डावलून आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबातील व्यक्तींना शासकीय अनुदानाचा लाभ मिळत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजनांच्या अंमलबजावणीतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बल्लारपूर शहरात श्रावणबाळ योजनेचे ५ हजार ६४९, तर संजय गांधी निराधार योजनेचे ४ हजार ७०६ लाभार्थी आहेत. विशेष म्हणजे, श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये अशा ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे, ज्यांची मुले शासकीय किंवा खासगी नोकरीत कार्यरत असून कुटुंबाला नियमित आर्थिक उत्पन्न आहे. कुटुंबात कमावती व्यक्ती असतानाही संबंधित ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत मिळत असल्याने त्यांच्या पात्रतेची योग्य तपासणी झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांबाबतही अशाच प्रकारच्या चर्चा शहरात सुरू आहेत. काही लाभार्थी नोकरी किंवा व्यवसाय करून आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे योजनेच्या पात्रतेचे निकष नेमके कसे तपासले जातात आणि अशा लाभार्थ्यांना अनुदान मंजूर कसे होते, याची चौकशी होणे आवश्यक आहे. या संपूर्ण प्रक्रियेत राजकीय शिफारशींचाही वापर होत असल्याची चर्चा आहे. काही राजकीय नेत्यांकडून विशिष्ट व्यक्तींच्या नावांची शिफारस केली जात असल्याचे बोलले जात असून, दुसरीकडे योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी काही दलालही सक्रिय असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रे गोळा करून त्यांची प्रकरणे मंजूर करून देण्यासाठी काही मध्यस्थ काम करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे या योजनांच्या लाभार्थी निवडीची प्रक्रिया पारदर्शक आहे का, की शिफारशी आणि मध्यस्थांच्या माध्यमातून लाभार्थ्यांची निवड होत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

या योजनांमध्ये लाभार्थ्यांची निवड करताना कौटुंबिक परिस्थिती, उत्पन्नाचे स्रोत आणि आर्थिक स्थिती यांची प्रत्यक्ष पडताळणी करणे आवश्यक आहे. संबंधित महसूल कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांच्या घरी जाऊन परिस्थितीची पाहणी करणे अपेक्षित असताना, बल्लारपूरमध्ये प्रत्यक्ष घरभेटी घेतल्या जातात की केवळ कार्यालयीन कागदपत्रांच्या आधारे लाभार्थ्यांची निवड केली जाते, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. महसूल यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शासनाकडून गरजूंसाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या निधीचा लाभ अपात्र व्यक्तींना मिळत असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे बल्लारपूर तहसील प्रशासनाने दोन्ही योजनांतील सर्व १० हजार ३५५ लाभार्थ्यांच्या पात्रतेची नव्याने तपासणी करावी. प्रत्यक्ष घरभेटी देऊन कुटुंबाचे उत्पन्न, मुलांची नोकरी, आर्थिक परिस्थिती आणि लाभार्थ्यांची वस्तुस्थिती तपासावी. तसेच राजकीय शिफारशी आणि कथित दलालांच्या हस्तक्षेपाचीही निष्पक्ष चौकशी करून पात्रतेचे निकष पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांची नावे वगळावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

निराधार आणि वृद्ध नागरिकांसाठी या योजना जीवनाचा मोठा आधार आहेत. मात्र, पात्रतेच्या निकषांना बगल देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींना लाभ मिळत असेल, तर खऱ्या गरजूंवर अन्याय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बल्लारपूर तहसील प्रशासन या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेणार का? लाभार्थ्यांची फेरतपासणी करून कथित गैरप्रकारांचा पर्दाफाश करणार का, याकडे आता शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.





  Print






Related Photos