राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील प्रश्न कौशल्याचे महत्त्व

मानवाची प्रगती व उत्क्रांती त्याला पडलेल्या प्रश्नातून झाली आहे. विश्वाची उकल होण्यामध्ये समाजशास्त्रज्ञ, वैज्ञानिक यांना पडलेल्या प्रश्नांचा सिंहाचा वाटा आहे. प्रश्नाचे उत्तर मिळेपर्यंत स्वस्थ न बसणे हा मानवी स्वभाव आहे. प्रश्न विचारणे हे ज्ञान प्राप्तीचे साधन आहे. प्रश्न विचारणे ही शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी स्वाभाविक प्रक्रिया आहेत. या सहज स्वाभाविक प्रक्रियेचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्रश्न कौशल्य असे वर्णन करण्यात आले आहे. प्रस्तुत लेखात मी विद्यार्थ्यांच्या विविध क्षमता विकसित करण्यासाठी प्रश्नकोशल्याचा अचूक वापर करून अध्ययन निष्पत्ती कशी प्राप्त करू शकतो हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रश्न कौशल्य हे मूल्यांकनातील अति महत्त्वाचे कौशल्य आहे जे विद्यार्थ्यांचे सर्वांगीण मूल्यांकन करण्यासाठी शिक्षकांना मदत करते. एखाद्या शिक्षकाला प्रश्न कौशल्य हे कौशल्य अवगत असल्यास शिकविलेल्या घटकाचे विद्यार्थ्याला कितपत ज्ञान झालेले आहे. त्या घटकातील किती क्षमता विद्यार्थ्याला अवगत झालेल्या आहेत हे प्रश्न कौशल्याच्या आधारे जाणून घेता येते. प्रश्न हे कुतूहल शांत करण्याचे आणि सदा नवीन माहिती मिळविण्याचे व ज्ञान प्राप्तीचे साधन आहे. अध्यापनाच्या प्रारंभापासून ते अध्यापन पूर्ण झाल्यावरही अध्यापनाच्या विविध पायऱ्यावर शिक्षकांकडून प्रश्नांचा वापर होत असतो. नियोजित पाठ्यांशाच्या अध्यापनाची उद्दिष्टे यांची पडताळणी व पूर्वज्ञानाची चाचणी प्रश्नांच्या आधारे करता येते. त्यासाठी प्रश्न हे विद्यार्थ्यांचे सर्वांगीण मूल्यांकन करणारे असावेत. प्रश्न हे विद्यार्थ्यांची क्षमता समोर ठेवून त्यावर अध्ययन निष्पत्ती शोधायच्या असतात आणि अध्ययन निष्पत्ती वर आधारित प्रश्न निर्मिती करायची असते मूल्यांकन हे शिक्षण प्रक्रियेचे अविभाज्य अंग असून अध्यायन अध्यापन प्रक्रिया सुरू असताना वेळोवेळी मूल्यांकनाची गरज भासत असते. कारण मुल्यांकनात विद्यार्थ्यांची संपादनूक आपणास दृश्य स्वरूपात दिसून येते. मुल्यांकनासाठी प्रश्न कसे असावेत ते बघूयात .......
प्रश्न हे विचाराला चालना देणारे असावेत. प्रश्नांची रचना सुबोध आणि नेमक्या शब्दात असायला पाहिजे. प्रश्न निसंदिग्ध व निश्चित स्वरूपाचे असावेत. प्रश्नांची रचना निर्दोष असावी. प्रश्न अति सुलभ, सोपे नसावे. खूप कठीण आणि गुंतागुंतीचे नसावेत. संमिश्र स्वरूपाचे नसावे. म्हणजे एका प्रश्नात दोन प्रश्न नसावेत. एका वेळी एकच प्रश्न असावा. प्रश्न उत्तर सुचक नसावे. बंदिस्त प्रश्न नसावे. उदाहरणार्थ- हो किंवा नाही अशीच उत्तर येणारे नसावेत. केवळ पुस्तकी किंवा अलंकारिक भाषेचा वापर नसावा. प्रश्न संदीग्ध असू नयेत. प्रश्नाचे काही प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे ......
निबंध वजा- प्रश्नामध्ये दीर्घोत्तरी आणि लघुत्तरी असे दोन प्रकार पडतात.
दीर्घोत्तरी- यामध्ये निबंध, कल्पनाविस्तार, पत्र लेखन, इत्यादीचा समावेश होतो. लघुत्तरी मध्ये- यामध्ये व्याख्या द्या, शास्त्रीय कारणे, टिपा लिहा, अशा प्रश्नांचा समावेश होतो.
वस्तुनिष्ठ प्रश्न- यात आकृती पूर्ण करा, कल्पना करा, खेळूया शब्दांशी, अशा प्रश्नांचा समावेश होतो .
द्विपर्यायी प्रश्न- यात एका प्रश्नाची दोन उत्तरे दिलेली असतात. त्यापैकी एक पर्याय निवडायचा असतो.
बहुपर्यायी प्रश्न- यात एका प्रश्नाचे चार पर्याय दिलेले असतात. त्यापैकी एक पर्याय निवडायचा असतो. जोड्या लावा, एका वाक्यात उत्तरे द्या, चूक की बरोबर, कोण कोणास म्हणाले, इत्यादी प्रश्नांचा समावेश होतो.
मुक्त प्रकारचे प्रश्न- यामध्ये उत्तर खुला स्वरूपाचे असते. विचारांना मोकळीक दिली जाते. उदाहरणार्थ- कल्पनाविस्तार, निबंध अशा प्रश्नांचा यात समावेश होत असतो.
बद्ध प्रकारचे प्रश्न- यामध्ये उत्तर निश्चित असते. त्याचे उत्तर लवकर मिळत असते. सर्वेक्षणे, चाचण्या, माहिती गोळा करणे, इत्यादी कामासाठी हा प्रश्न प्रकार उपयुक्त असतो. दोन पर्यायातून उत्तर शोधणे, हो- नाही, सत्य- असत्य, चूक- बरोबर, जोड्या लावा, बहुपर्यातून उत्तर शोधणे, अपूर्ण विधान पूर्ण करणे, इत्यादी प्रश्नांचा समावेश होतो. आवर्ती प्रश्न- यामध्ये एका प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांकडून त्याच्याशी संबंधित असणारे अनेक उपप्रश्न विचारणे आणि त्या उत्तरापर्यंत येऊन पोहोचणे अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश असतो.
उदाहरणार्थ -
प्रश्न- पाव मीटर म्हणजे किती? या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी या प्रश्नाशी संबंधित प्रश्न विचारावे लागतात.
प्रश्न- पाव म्हणजे किती भागांपैकी किती भाग?
उत्तर- चार भागांपैकी एक भाग म्हणजे पाव होय.
प्रश्न- एक मीटर म्हणजे किती सेंटीमीटर ?
उत्तर- एक मीटर म्हणजे १०० सेंटीमीटर.
प्रश्न- प्रत्येक भागात किती सेंटीमीटर आले ते सांगा.
उत्तर- २५ सेंटीमीटर.
२५ सेंटिमीटर म्हणजेच पाव मीटर होय.
निम्नस्तर प्रश्न- या प्रश्नाचे उत्तरे हे स्मरणावर आधारित असतात, ज्ञानावर आधारित असतात.
उच्चस्तरीय प्रश्न- या प्रश्नाचे उत्तर देताना विद्यार्थ्यांना ज्ञानाचे प्रथम कार्यकारण भाव शोधावे लागतात. उच्चस्तरीय प्रश्न ही एक अशी विचार प्रक्रिया आहे जे केवळ पाठांतराच्या ही पलीकडे जाऊन तिचा विश्लेषण, मूल्यमापन आणि सर्जनशीलतेने उपयोग करण्यावर भर देते. त्यामुळे विद्यार्थ्यांना माहितीला व्यवस्थितपणे हाताळणे, समस्यांचे समाधान करणे, निर्णय घेणे आणि नवकल्पना करणे शक्य होते.
पुस्तकासह चाचणी- यामध्ये प्रश्नाचे स्वरूप आणि रचना अशी असते की विद्यार्थ्यांना निश्चित केलेल्या वेळेत संबंधित संदर्भ साहित्याचा वापर करून प्रश्नांची उत्तरे सोडविणे अपेक्षित असते. ही चाचणी विद्यार्थी केंद्रित असते. आकलनांवर भर असते. सक्षमीकरणाचा विकास यातून होत असतो. तणाव रहित मूल्यमापन होते. यातून संदर्भ पुस्तकाचे वाचन होते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होते. मूल्यमापनात सहजता येते. स्वयं अध्ययनास प्रेरणा मिळते. भीती नाहीशी होते. सर्जनशीलता वाढीस लागते. विद्यार्थी स्वावलंबी बनण्यास मदत होते. प्रश्न हे नव निर्मितीला वाव देणारेही असले पाहिजेत. या प्रश्नांमध्ये विद्यार्थी स्वतः उदाहरणे तयार करू शकतात. एकच उत्तर येणारे अनेक प्रश्न तयार करू शकतात. एकापेक्षा अनेक संकल्पनांचा वापर करू शकतात. येथे विचारांना मर्यादा घातली जात नाही. विषयानुरूप विचार मंथनासाठी देखील प्रश्न असावेत.
उदाहरणार्थ - गणितीय गप्पा. विद्यार्थ्यांना एखादे चित्र देऊन त्याचे रूपांतरण करण्यास सांगणे. एखादी वस्तू देऊन त्याबद्दल गणित स्पष्टीकरण देण्यास सांगणे. व्यवहारातील कोणत्या गोष्टींमध्ये कोणते गणित दडलेले आहे याचे वर्णन करणे. एखादी संकल्पना वर्गात सर्वांसमोर स्पष्ट करणे. या सगळ्यामुळे गणिताची भीती कमी होते. गणिताची जी भाषा आहे ती परिचित होण्यास मदत होते. वेगवेगळ्या गोष्टीत गणित लपले आहे हे शोधण्याचा दृष्टिकोन विकसित होतो. आता संदर्भासाठी खाली काही प्रश्न प्रकार उदाहरणासहित दिलेले आहेत.
इयत्ता चौथीच्या गणित विषयातील मापन हा घटक घेतल्यास.......
क्षमता- विद्यार्थी मापन कौशल्य जाणतो.
अध्ययन निष्पत्ती- १) विद्यार्थी सेंटीमीटर चे मीटर मध्ये आणि मीटर चे सेंटीमीटर मध्ये रूपांतर करतो.
२) दोन जागेतील अंतराचे अंदाज करतो किंवा दोन वस्तूमधील अंतराचा अंदाज करतो.
३) विशिष्ट वस्तूंचे वजन सांगतो.
४) पदार्थाची धारकता मोजतो.
५) प्रत्यक्ष मापन करून वस्तूंचे वजन धारकता सांगतो.
६) मापनावर शाब्दिक उदाहरणे सोडवतो .
७)मापनाचा दैनंदिन जीवनातील उदाहरणे सोडवण्यास उपयोग करतो .
a) ज्ञान आधारित प्रश्न- ७ सेंटिमीटर बरोबर किती मीटर ?
b) आकलन आधारित प्रश्न- दिलेली रेषा स्केलच्या साह्याने मोज आणि किती सेंटीमीटर व मिलिमीटर ते लिही .
c) उपयोजनावर आधारित प्रश्न- वर्गातील वस्तूंचे लांबी मोज व किती सेंटीमीटर व मीटर ते लिही.
d) विश्लेषणात्मक प्रश्न- फळ व भाज्यांचे वजन करून त्यांचे वजन ग्रॅम किलोग्रॅम मध्ये दाखविणाऱ्या चार्ट तयार करा.
e) सर्जनशीलता आधारित प्रश्न- राशन दुकानातील वस्तू खरेदीची यादी तयार करा .
f) तर्काधीष्टीत प्रश्न- पाव मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? अर्धा मीटर म्हणजे किती सेंटीमीटर ? पाऊण मीटर म्हणजे किती सेंटीमीटर ?
g) बहुविध निवडीचे प्रश्न- (मल्टिपल चॉइस क्वेश्चन्स) चार लिटर म्हणजे किती मिलीमीटर?
१) ४० मिलिमीटर २) ४ हजार मिलिमीटर ३) ४०० ml ४) ४ ml h) समस्यांवर आधारित प्रश्न-( प्रॉब्लेम बेस्ट क्वेश्चन्स) सुलभाने साडेचार मीटर कापड घेतले त्याचे पाच सारखे भाग करून आपल्या मित्रांना ते सारखे वाटले, तर प्रत्येक मित्राला किती कापड मिळाले ?
i ) संवादात्मक प्रश्न- बसने जाताना रस्त्यावर एका दगडावर सातारा २५ किलोमीटर असे लिहिले होते याचा अर्थ काय असेल सांगा पाहू.
j) दैनंदिन जीवनावर आधारित प्रश्न- एक कपभर पाणी म्हणजे किती मिलिमीटर ते मोजा आणि एक लिटर पाणी भरण्यासाठी किती कप पाणी घ्यावे लागेल याचा अंदाज करा चर्चा करा.
- कु. विजया शरद किरमिरवार,
प्राथमिक शिक्षिका, लोक बिरादरी आश्रमशाळा, हेमलकसा
News - Editorial




Petrol Price




