राज्य सरकारच्या परवानगीने वेळेच्या बंधनातून शाळा सुटणार : पाचवीपर्यंतचे वर्ग सकाळी भरविणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : पाचवीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊनंतर भरविण्याबाबतच्या राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या आदेशाला अनुसरून मुंबईतील खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांना वेळेची सक्ती करणारे परिपत्रक लवकरच मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून काढण्यात येणार आहे.
ज्या शाळांना नऊनंतर पूर्व प्राथमिक आणि प्राथमिकपर्यंतचे वर्ग भरविणे शक्य नाही, त्यांना राज्य सरकारच्या परवानगीने वेळेच्या बंधनातून सूट दिली जाईल.
महापालिकांच्या शाळांमध्ये मात्र नवीन शैक्षणिक वर्षापासून पाचवीपर्यंतचे सर्व वर्ग सकाळी नऊनंतर भरविण्यात येणार असल्याचा निर्णय बुधवारी झालेल्या पालिकेच्या शिक्षण विभागाच्या बैठकीत घेण्यात आला. सात वाजता भरविण्यात येणाऱ्या शाळेमुळे लहान मुलांना पुरेशी झोप मिळत नाही. म्हणून नर्सरी ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सकाळी नऊनंतर भरविण्यात यावे, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र, मुंबईसह राज्यातील अनेक भागातील खासकरून खासगी अनुदानित, विनाअनुदानित शाळांचा याला विरोध आहे.
पुरेशा वर्गांचा अभाव, शिक्षक-पालकांचा विरोध, वाहतूक कोंडी, शाळा बस चालकांचा विरोध इत्यादी कारणांमुळे अनेक शाळांनी वेळेबाबतचे बंधन पाळणे शक्य नसल्याची भूमिका घेतली आहे. प्राथमिक शिक्षणाबाबतचे निर्णय महापालिका शिक्षणाधिकारी घेतात. त्याबाबत आतापर्यंत पालिका शिक्षण विभागाकडून स्पष्ट सूचना न आल्याने आधीच्याच वेळेनुसार शाळा सुरू करण्याची तयारी मुंबईतील शाळांनी केली होती. मात्र, सरकारच्या निर्णयानुसार वेळेबाबत बंधने घालणारे परिपत्रक लवकरच पालिका शिक्षण विभागाकडून काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्या शाळांना नवीन वेळेनुसार वर्ग भरविणे शक्य नाही, त्यांनी तसे पत्र द्यावे. राज्य सरकारच्या मान्यतेने अशा शाळांना वेळेच्या बंधनातून सूट दिली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पालिकेच्या शाळांमध्ये नियमाची अंमलबजावणी -
महापालिकेच्या शाळा सकाळी, मधल्या आणि दुपारी अशा तीन सत्रात भरविल्या जातात. काही शाळांमधील प्राथमिकचे वर्ग सकाळी लवकर भरविले जातात. ते आता मधल्या किंवा दुपारच्या सत्रात भरविले जातील. आणि दुपारच्या सत्रात भरणारे पाचवीनंतरचे वर्ग सकाळच्या सत्रात भरविले जातील, अशी माहिती पालिका शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली.
News - Rajy