महत्वाच्या बातम्या

 पेंटीपाका शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यास शिक्षकाकडून मारहाण, मुलगा जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : तालुक्यातील पेंटीपाका गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या इयत्ता पहिलीतील उमेश राजेश काळबांडे (वय ८) या अल्पवयीन विद्यार्थ्याला शाळेच्या वेळेत शिक्षकाकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ३ जानेवारी रोजी घडली असून या मारहाणीत उमेश जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेत कार्यरत शिक्षक मधुकर बट्टीवार यांनी उमेशला अमानुष मारहाण केली. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सागर मूलकला यांची तत्काळ मदत -
या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ता तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे सिरोंचा तालुका अध्यक्ष आणि पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर मूलकला यांनी तत्काळ जखमी मुलाच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांकडून घटनेची माहिती घेतली.

जखमी मुलाचे कुटुंब अत्यंत गरीब असल्याने उपचारासाठी त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून आले. ही बाब लक्षात घेऊन सागर मूलकला यांनी पुढाकार घेत मुलाच्या उपचारासाठी आर्थिक मदत केली. यावेळी त्यांनी संबंधित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे ठाम आश्वासन दिले.

तात्काळ कारवाईची मागणी -
या घटनेमुळे शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून संबंधित शिक्षकावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos