दोन दिवस, दोन बळी! शेतात जाणेही झाले धोक्याचे : सिंदेवाहीत वाघाची दहशत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : पोटाची खळगी भरण्यासाठी शेतात गेले अन् मृत्यूनेच गाठले! सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्याने दोन दिवसांत दोन जणांचा बळी घेतल्याने परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. शनिवारी पळसगाव (जाट) येथील ६० वर्षीय शेतकरी नानाजी नारायण कामडी यांचा मृत्यू झाला, तर रविवारी भेंडाळा (खातगाव) येथील ५५ वर्षीय प्रेमीला बंडू महाडोरे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. सलग दोन दिवस घडलेल्या या घटनांनी शेतकरी कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शेतात जायचे तरी कसे, असा प्रश्न आता प्रत्येक शेतकऱ्याला सतावत आहे.
या घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलीस ठाण्याच्या निरीक्षक लता वाढिवे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक, वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली बोरावार/सायंकार आणि स्वाब संस्थेचे यश कायरकर व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. हल्ला करणाऱ्या वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी घटनास्थळी लाइव्ह आणि ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले.
पहिल्या घटनेनंतर वन विभागाने गस्त वाढवून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली होती. मात्र, रविवारी, २५ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्याची घटना घडली. भेंडाळा (खातगाव) येथील प्रेमीला बंडू महाडोरे या ५५ वर्षीय महिला आपल्या पतीसोबत शेतावर गेल्या असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. दोन दिवसांत दोन जणांचा मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिक हादरून गेले आहेत.
शनिवारी, २४ ऑक्टोबर रोजी पळसगाव (जाट) येथील नानाजी नारायण कामडी हे कापून ठेवलेले तीळ आणण्यासाठी दुपारी तीन वाजताच्या सुमारास शेतावर गेले होते. मात्र, सायंकाळ झाली, रात्र झाली, तरी ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली. परिसरात वाघाचा वावर असल्याची चर्चा असल्याने कुटुंबीयांनी वन विभागाला माहिती दिली आणि शेतशिवारात शोध सुरू केला. अखेर शेतातील बांधाजवळ नानाजी कामडी मृतावस्थेत आढळले. वन विभागाच्या पाहणीत त्यांच्यावर वाघाने हल्ला केल्याचे निदर्शनास आले.
सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. शेतातील पिकांची काढणी, मळणी आणि शेतमाल घरी आणण्याची लगबग सुरू असतानाच वाघाच्या हल्ल्यांनी शेतशिवारात दहशत निर्माण केली आहे. हातातोंडाशी आलेले पीक घरी आणण्यासाठी शेतात जाणेही आता जीवघेणे ठरत असल्याचे चित्र या घटनांमधून समोर आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वाघाचे दर्शन होत असल्याची चर्चा होती. तरीही शेतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात जावे लागत आहे. आता मात्र प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात भीती निर्माण झाली आहे. शेतात गेलेला आपला माणूस सुरक्षित परत येईल की नाही, ही चिंता कुटुंबीयांना सतावत आहे.
दोन दिवसांत दोन जीव गेल्यानंतरही आणखी किती बळींची वाट पाहायची? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वन विभागाने वाघाचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, तसेच शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.




Petrol Price




