महत्वाच्या बातम्या

 रामनगर पोलिसांची अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई : एमडी पावडरसह दोघे अटकेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरातील इंदिरानगर परिसरात सुरू असलेल्या अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारावर रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) पावडरसह एका महिलेसह दोन आरोपींना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १ लाख ५६ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी अमरीन हनीफ शेख (वय ३३), रा. इंदिरानगर, मक्का मस्जिद जवळ, चंद्रपूर आणि यशोधन प्रकाश नेल्लुरी (वय २२), रा. संजयनगर, मुल रोड, दुर्गा माता मंदिर जवळ, चंद्रपूर यांना अटक करण्यात आले आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करून जेलमध्ये पाठविण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, रामनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबवत होते. तसेच अंमली पदार्थ प्रतिबंधक कारवाईसाठी पथक शहर परिसरात खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, इंदिरानगर येथील मक्का मस्जिद परिसरात राहणारी अमरीन हनीफ शेख ही आपल्या राहत्या घरी अवैधरित्या एमडी पावडर साठवून ठेवून विक्री करीत आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित घरावर छापा टाकला. घरझडतीदरम्यान कपाटामधून १०.१५ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) सदृश्य अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. बाजारभावानुसार या अंमली पदार्थाची किंमत सुमारे ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कारवाईदरम्यान घरात उपस्थित असलेल्या यशोधन प्रकाश नेल्लुरी याची अंगझडती घेण्यात आली. तसेच घरातून विविध कंपन्यांचे ९ मोबाईल फोन, एमडी पावडरचे वजन करण्यासाठी वापरण्यात येणारा इलेक्ट्रिक काटा आणि ३ हजार १५० रुपयांची रोख रक्कम असा एकूण १ लाख ५६ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आरोपी अमरीन हनीफ शेख (३३, रा. इंदिरानगर, मक्का मस्जिद जवळ, चंद्रपूर) आणि यशोधन प्रकाश नेल्लुरी (२२, रा. संजयनगर, मुल रोड, दुर्गा माता मंदिर जवळ, चंद्रपूर) यांच्याविरुद्ध एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत कलम ८(क), २२(ब) व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकदे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके तसेच गुन्हे अन्वेषन पथकातील पोउपनि. कृष्णा दराडे, पो.हवा  रामप्रसाद नैताम, आंनद, प्रकाश बलकी, शरद कुडे, जितेंद्र आकरे, मपोहवा मनिषा, मपोहवा जया बारतिने, पोअं संदिप, पंकज, सुरेश कोरवार, रविकुमार, प्रफुल्ल, पंकज पोंदे यानी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos