महत्वाच्या बातम्या

 एक तास बस रोखून ठेवल्याने प्रवाशांचा संताप : आजाद समाज पार्टीची महामंडळ प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर सडकून टीका


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : ०७ मे रोजी गडचिरोलीवरून खांबाडा येथे साधारण ९-१० वाजता दरम्यान जाणारी एसटी बस धानोरा तालुक्यातील ढवळी गावाजवळ तिकीट काढण्याची मशीन अचानक बंद पडल्याच्या कारणावरून तब्बल एक तास रस्त्यात उभी ठेवण्यात आल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. बसमध्ये प्रवास करणारे अनेक कर्मचारी, रुग्ण तसेच इतर प्रवासी यामुळे अडचणीत सापडले.

प्रवाशांनी चालक व वाहक यांच्याकडे बस का थांबवून ठेवली याबाबत विचारणा केली असता, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न देता उलट उद्धट व अरेरावीची भाषा वापरण्यात आल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. बस इथून सोडणार नाही, जायचं असेल तर जा नाहीतर जे बनतं ते करा, अशी असभ्य उत्तरे संबंधित कर्मचाऱ्यांकडून देण्यात आल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले.

तिकीट मशीन खराब होणे आणि बस सेवा थांबवणे यांचा कोणताही संबंध नसून, अशा परिस्थितीत एसटी महामंडळाने मॅन्युअल पद्धतीने तिकीट देण्याची पर्यायी सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. मात्र प्रवाशांना वेठीस धरून बस थांबवणे हा पूर्णपणे बेजबाबदार व अन्यायकारक प्रकार असल्याची टीका होत आहे.

या संपूर्ण प्रकारावर आजाद समाज पार्टीने तीव्र नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर सडकून टीका केली आहे. सदर प्रकरणाची प्रवाशांकडून तक्रार प्राप्त होताच पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी तात्काळ आगार प्रमुखांशी दूरध्वनीवर संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिल्यानंतर संबंधित बस पुढे रवाना करण्यात आली.

दरम्यान, भविष्यात अशा प्रकारे प्रवाशांना त्रास देणाऱ्या घटना पुन्हा घडल्यास आजाद समाज पार्टी गडचिरोलीच्या वतीने संबंधित एसटी डेपोवर तीव्र हल्लाबोल आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी दिला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos