अंधश्रद्धेचा खेळ की गुप्तधनाचा शोध? ठाणेगाव येथे रात्रीच्या सुमारास जमिनीचे रहस्यमय खोदकाम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : तालुक्यातील ठाणेगाव येथील वैरागड मार्गालगत एका निर्जन स्थळी रात्रीच्या सुमारास जमिनीचे रहस्यमय खोदकाम करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, खड्डा खोदून तो काही वेळातच पुन्हा बुजवण्यात आला आणि त्या ठिकाणी धार्मिक विधी व पूजाअर्चा केल्याचे अवशेष आढळून आले आहेत. या गूढ घटनेमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून नागरिकांमध्ये कुतूहलासह चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणेगाव परिसरातील वैरागड मार्गालगत असलेल्या एका मोकळ्या जागेवर रात्रीच्या अंधारात अज्ञात व्यक्तींनी यंत्राच्या साहाय्याने जमीन उकरल्याचे दुसऱ्या दिवशी सकाळी स्थानिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर सदर खड्डा पुन्हा मातीने व्यवस्थित बुजवून ती जागा सपाट करण्यात आली होती. मात्र, त्या ठिकाणाची पाहणी केली असता, तिथे नारळ, अगरबत्तीचे अवशेष, पूजेचे साहित्य पडलेल्या आढळल्या. यावरून या ठिकाणी अज्ञात व्यक्तींनी गुप्तधनाच्या भ्रामक कल्पनेतून किंवा अंधश्रद्धेच्या पोटी हा प्रकार केला असावा, अशी चर्चा आता सर्वत्र रंगली आहे.
अंधश्रद्धेबाबत जनजागृतीची गरज -
आजच्या वैज्ञानिक युगातही अशा प्रकारच्या अंधश्रद्धेपोटी आणि गुप्तधनाच्या लोभापोटी रात्रीच्या वेळी अज्ञातांकडून होणाऱ्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण नसले, तरी अंधश्रद्धेच्या अशा घातक प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्याची आणि जनजागृती करण्याची तीव्र गरज व्यक्त होत आहे.




Petrol Price




