महत्वाच्या बातम्या

 दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भंडाऱ्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक मोहीम


- ८.५९ लाखांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त; ६८ मिठाई पेढ्यांना नोटिसा, ९ आस्थापनांचे परवाने निलंबित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मिठाई, फरसाण, दुग्धजन्य पदार्थ आणि विविध खाद्यपदार्थांची मागणी वाढली आहे. या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, तसेच भेसळयुक्त व प्रतिबंधित खाद्यपदार्थांच्या विक्रीला आळा बसावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने भंडारा जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबविली आहे. या मोहिमेदरम्यान ८ लाख ५९ हजार रुपये किमतीचा ३७८.२१० किलो प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील ६८ मिठाई पेढ्यांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या असून, ७ उत्पादक आणि २ हॉटेल्स अशा एकूण ९ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

दिवाळीच्या काळात मिठाई, दूध व दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल आणि फरसाण यांची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होते. याच पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी प्रशासनाने जिल्हाभरात तपासणीचा धडाका लावला आहे. या मोहिमेंतर्गत दूध व दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, मिठाई आणि फरसाण यांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. मिठाई व फरसाणाचे २१८ नमुने, तसेच २०१ सर्वेक्षण नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

४४ पेढ्यांना २.९५ लाखांचा दंड -
जिल्ह्यातील मिठाई विक्री केंद्रांची तपासणी करताना विविध त्रुटी आढळून आल्याने ६८ पेढ्यांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या. त्यापैकी ४४ पेढ्यांना एकूण २ लाख ९५ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच आठ पेढ्यांमधून ४ हजार २५५ किलो अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत ५ लाख ८७ हजार रुपये आहे. याशिवाय प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठ्यावरही कारवाई करण्यात आली आहे.

४७ तक्रारींवर कार्यवाही -
अन्न व औषध प्रशासनाकडे विविध माध्यमांतून एकूण ४७ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या सर्व तक्रारींच्या अनुषंगाने प्रशासनाने कार्यवाही केली आहे. मिठाई विक्री केंद्रांसोबतच रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते, यात्रा परिसर आणि दूध विक्री केंद्रांचीही तपासणी करण्यात आली. अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, सात उत्पादक आणि दोन हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

ग्राहकांनीही घ्यावी काळजी -
सणासुदीच्या काळात नागरिकांनी खाद्यपदार्थ खरेदी करताना विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मिठाई व फरसाण खरेदी करताना उत्पादनाची तारीख, अंतिम वापराची तारीख, घटक पदार्थ आणि एफएसएसएआय परवाना क्रमांक तपासावा. उघड्यावर ठेवलेले, अस्वच्छ परिस्थितीत तयार केलेले, दुर्गंधीयुक्त किंवा अनावश्यक कृत्रिम रंगांचा वापर केलेले पदार्थ खरेदी करणे टाळावे. अधिकृत विक्रेत्यांकडूनच खाद्यपदार्थ खरेदी करून त्याचे बिल घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत किंवा भेसळीबाबत संशय असल्यास नागरिकांनी लेखी अथवा ऑनलाइन माध्यमातून तक्रार नोंदवावी. अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त निलेश ताथोड यांनी दिला आहे.





  Print






Related Photos