३० वर्षांनी पुन्हा जुळल्या जुन्या आठवणींच्या तार : गांधी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : गांधी विद्यालय, डेपो विभाग, बल्लारपूर येथील सन १९९७ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी, ३० ऑगस्ट रोजी बल्लारपूर येथील विश्रामगृहात उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. तब्बल ३० वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देत स्नेहबंध पुन्हा घट्ट केले. स्नेहमेळाव्याचा कार्यक्रम सुरू असतानाच बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे अचानक विश्रामगृहात आगमन झाले. अनपेक्षितपणे आमदार मुनगंटीवार उपस्थित राहिल्याने माजी विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार मुनगंटीवार म्हणाले की, दहावीचे मित्र हे आयुष्यभराचे मित्र असतात. पद आणि पैसा आज आहे, उद्या नसेल; मात्र मैत्री हीच आयुष्याची खरी संपत्ती आहे. ३० वर्षांनंतरही आपल्या मातृसंस्थेची आठवण ठेवून एकत्र येणे ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शाळेतील तत्कालीन गुरुजनांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला शाखा अभियंता वैभव जोशी, दुधे सर, मून सर, किडझरकर सर आणि माडेकर सर यांची प्रमुख उपस्थिती होती. स्नेहमेळाव्यास प्रशांत झांमरे, अजय गीदवानी, प्रीतीताई चिवंडे, विजय सोनुले, शशिकांत राजुरकर यांच्यासह १९९७ च्या बॅचचे सुमारे ४५ ते ५० माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी योगदान देण्याचा तसेच एका गरीब व हुशार विद्यार्थ्याला शैक्षणिक मदत करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत झांमरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शशिकांत राजुरकर यांनी केले.




Petrol Price




