महत्वाच्या बातम्या

 जागतिक मानसिक आरोग्य दिन व सप्ताहाचे उद्घाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : जगभरात १० ऑक्टोंबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. अनुभवलेले प्रसंग ऐकले; खरे आवाज, खरे बदल या वर्षीच्या घोषवाक्यावर आधारीत १० ते १६ ऑक्टोंबर या कालावधीत मानसिक आरोग्य सप्ताहाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आयोजित जागतिक मानसिक आरोग्य दिन व सप्ताहाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजसिंह पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय गाठे, न्यायविज्ञान तज्ञ डॉ. राजेश कुडे, मनोविकार तज्ञ डॉ. सुदर्शन हरले आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. राजसिंह पवार यांनी रुग्ण व रुग्णाचे  अधिकार, मनोरुग्णांना देण्यात येणारे दिव्यांग प्रमाणपत्र, मानसिक आरोग्य सांभाळण्याकरीता  शासनाकडून चालविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. संजय गाठे यांनी मानसिक आजार तसेच विविध आपत्तीमुळे उद्भवणारी नैराश्याची स्थिती आणि आत्महत्येचे प्रयत्न यावर प्रकाश टाकला.

कार्यक्राचे प्रास्ताविक डॉ. सुदर्शन हरले यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन समाजसेवा अधीक्षक केवल शेंडे यांनी तर आभार किरण दिघडे यांनी  मानले. यावेळी मानसिक आरोग्य माहिती पत्रकाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मानसिक आरोग्य विभागाच्या वैशाली झाडे, सच्छिद्र सोनोने, मोनाली मोहोर्ले,  किरण वानखेडे,  रीता थुल, मीनल वाहणे, दिपाली इंगळे, श्वेता गावंडे, राहुल कठाणे आदींनी परिश्रम घेतले, असे सामान्य रुग्णालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.





  Print






Related Photos