गडचिरोलीत २६ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सव


- लोकनृत्य, लोकगीत, चित्रकला, पथनाट्य व कवितालेखन स्पर्धांचा समावेश; विजेत्यांना विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावर संधी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : युवकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, त्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन करणे आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणे या उद्देशाने गडचिरोली येथे २६ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी हा महोत्सव १९ नोव्हेंबर रोजी होणार होता; मात्र तांत्रिक कारणास्तव त्याच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. हा महोत्सव जिल्हा क्रीडा संकुल, कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे पार पडणार आहे.
केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयामार्फत आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाचे स्वरूप आता YBYLD अर्थात विकसित भारत @2047 या संकल्पनेशी जोडण्यात आले आहे. सन २०२६-२७ मधील राष्ट्रीय युवा महोत्सवांतर्गत ‘विकसित भारत चॅलेंज ट्रॅक’चे आयोजन १० ते १२ जानेवारी २०२७ या कालावधीत होणार आहे. त्यासाठी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.
जिल्हास्तरीय युवा महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत, चित्रकला, पथनाट्य आणि कवितालेखन या स्पर्धांचा समावेश आहे. सर्व स्पर्धांसाठी Nasha Mukt Yuva for Viksit Bharat ही संकल्पना निश्चित करण्यात आली असून जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर हीच संकल्पना कायम राहणार आहे.
जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या युवा कलाकारांना व संघांना विभागस्तरावर कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. विभागस्तरावर प्रावीण्य मिळविणाऱ्यांची राज्यस्तरासाठी, तर राज्यस्तरावर यश संपादन करणाऱ्यांची राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी निवड होणार आहे. प्रत्येक स्तरावर प्रावीण्य मिळविणाऱ्या कलाकार व संघांना शासनाकडून रोख पारितोषिकही देण्यात येणार आहे. मात्र, मागील वर्षी राष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेल्या युवक-युवतींना यंदाच्या VBYLD-2027 मध्ये सहभागी होता येणार नाही.
स्पर्धांचे नियम, सहभागी कलाकारांची संख्या आणि कला सादरीकरणासाठी निर्धारित वेळ यासंबंधीची सविस्तर माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक युवा कलाकारांनी या संधीचा लाभ घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




Petrol Price




