महत्वाच्या बातम्या

 वीज कंपन्यांच्या भविष्यासाठी एकजुटीने काम करण्याची गरज : एसईएच्या राज्य परिषदेत विचारमंथन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या ऊर्जानगर वसाहतीतील स्नेहबंध सभागृहात १० ऑक्टोबर रोजी सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन (एसईए – पीएन १०९२) च्या प्रथम निर्मिती राज्य परिषदेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील तिन्ही वीज कंपन्यांमध्ये कार्यरत अभियंत्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा, भविष्यातील आव्हानांवर विचारमंथन आणि संघटनात्मक कार्याचा आढावा घेत या परिषदेची यशस्वी सांगता झाली.

परिषदेच्या अध्यक्षस्थानी एसईएचे अध्यक्ष श्रीनिवास बोबडे होते. उपाध्यक्ष नारायण चकोर, सरचिटणीस संतोष खुमकर, संघटन सचिव अमोल भाकरे आणि निर्मिती समन्वयक ललित आल्हाट यांची प्रमुख उपस्थिती होती. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता डॉ. अनिल काठोये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते अभियंत्यांचे आराध्य दैवत भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.

महानिर्मिती कंपनीसमोरील भविष्यातील आव्हाने, वीज क्षेत्रातील सद्यस्थितीतील महत्त्वाचे प्रश्न, पेन्शनविषयक समस्या, मनुष्यबळाची उपलब्धता आणि तांत्रिक बाबींवर या परिषदेत सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महानिर्मितीच्या औष्णिक, जल आणि वायू विद्युत केंद्रांतील एसईएचे स्थानिक प्रमुख व पदाधिकारी या परिषदेत सहभागी झाले होते.

संघटनेचे सरचिटणीस संतोष खुमकर यांनी तिन्ही वीज कंपन्यांतील पेन्शनविषयक प्रश्नांवर सुरू असलेल्या घडामोडींची माहिती देत उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. स्थापित क्षमतेनुसार जास्तीत जास्त वीज निर्मिती करणे, पारेषण व वितरण व्यवस्थेत विजेची गुणवत्ता टिकवून ठेवणे आणि त्यासाठी आवश्यक मनुष्यबळासह तांत्रिक सुविधांची पूर्तता करण्याबाबत संघटनेने शासनदरबारी केलेल्या पाठपुराव्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

वीज कंपन्यांना भविष्यातील आव्हानांचा सामना करताना तसेच खासगीकरणाच्या वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तिन्ही वीज कंपन्यांनी एकजुटीने काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष श्रीनिवास बोबडे यांनी केले. कंपन्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी परस्पर समन्वय, संघटनात्मक एकता आणि सामूहिक प्रयत्न महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्य अभियंता डॉ. अनिल काठोये यांनी महानिर्मिती कंपनीसमोरील आव्हाने आणि भविष्यातील वाटचालीवर मार्गदर्शन केले. वीज क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीत अभियंत्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असून, तांत्रिक क्षमता आणि कार्यक्षमतेच्या बळावर कंपनीने पुढे जाण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी तिन्ही वीज कंपन्यांतील अभियंत्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एसईए संघटनेला शुभेच्छा दिल्या.

संघटनेच्या कार्यात सातत्याने योगदान देणाऱ्या आजीवन सदस्यांचा, सेवानिवृत्त तसेच सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या सदस्यांचा आणि कौशल्यप्राप्त सदस्यांचा विशेष गुणगौरव करून सत्कार करण्यात आला. परिषदेच्या दुसऱ्या सत्रात विविध विद्युत केंद्रांतील पदाधिकाऱ्यांसोबत संघटनेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. मुख्यालय पातळीवर संघटनेने हाती घेतलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. भरती प्रक्रिया, पदोन्नती आणि त्याव्यतिरिक्त उद्भवलेल्या विविध प्रश्नांवरही विचारविनिमय करण्यात आला.

या एकदिवसीय राज्य परिषदेमुळे राज्यभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना विविध प्रश्नांवर चर्चा करण्याची आणि संघटनेच्या आगामी कार्यदिशेबाबत विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळाली. परिषद यशस्वी झाल्याचे समाधान उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले. कार्यक्रमाचे आयोजन एसईएच्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र शाखेचे सहसचिव विशाल अंभोरे आणि त्यांच्या चमूने केले.

भोलेश सुकारे, अनितेश ठाकरे, हर्षद पद्मावार, विपुल वानखेडे, शोएब पटेल, धर्मेंद्रकुमार प्रजापती, रुपेश गोवरदीपे, हेमंत पवार, सूरज सुरजुसे, अंकित मुंडणे आणि नरेश चिलमुला यांनी आयोजनासाठी सहकार्य केले. हरिती राऊत आणि श्रद्धा दिवाकर यांनी सूत्रसंचालन केले. परिषदेच्या यशस्वितेसाठी संघटनेचे माजी पदाधिकारी आणि ज्येष्ठ सभासद सुनील तिवारी, विशाल फिसके, सुनील इंगळे व मनोज नळदुर्गकर यांचे मार्गदर्शन लाभले.





  Print






Related Photos