दारू का पितोस? विचारल्याचा राग : लोखंडी रॉडने हत्या

- धानोरा येथे १५ दिवसांपूर्वीच्या वादातून थरार; आरोपी आकाश वाटगुळे पहाटे अटकेत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : तू परमात्मा धर्म स्वीकारला आहेस, तर दारू कशाला पितोस?’ अशी विचारणा केल्याचा राग मनात धरून एका ४९ वर्षीय व्यक्तीची लोखंडी रॉडने डोक्यावर प्रहार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना धानोरा येथे घडली. अनिल नारायण मंगरे ४९ वर्षे रा. धानोरा असे मृताचे नाव असून, आकाश गिरीधर वाटगुळे ३२ वर्षे रा. धानोरा असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
१५ दिवसांपूर्वी झाला होता वाद -
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे १५ दिवसांपूर्वी अनिल मंगरे यांनी आकाश वाटगुळे याला दारू पिण्याबाबत समजावून सांगितले होते. तू परमात्मा धर्म स्वीकारला आहेस, तर दारू का पितोस? अशी विचारणा त्यांनी केली होती. यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. या वादाचा राग आकाशच्या मनात कायम होता. त्याच जुन्या वादातून २ सप्टेंबर रोजी रात्री दोघांची पुन्हा गाठ पडली आणि वादाचे पर्यवसान हत्येत झाले.
सिमेंट रस्त्यावर वाद विकोपाला -
२ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ९ वाजता गोविंदा राऊत यांच्या घरासमोरील सिमेंट रस्त्यावर आकाशने अनिल मंगरे यांना गाठले. यावेळी जुन्या वादाचा विषय पुन्हा निघाल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाला. वाद वाढत गेल्यानंतर आकाशने हातातील लोखंडी रॉडने अनिल यांच्या डोक्याच्या मागील बाजूस प्रहार केला. गंभीर मार लागल्याने अनिल मंगरे यांचा मृत्यू झाला. या घटनेने धानोरा परिसरात खळबळ उडाली.
तक्रारीनंतर पोलिसांची तत्काळ कारवाई -
घटनेची माहिती मिळताच सेवाग्राम पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या प्रकरणी सागर बारेकर २९ वर्षे रा. धानोरा यांच्या तक्रारीवरून सेवाग्राम पोलिस ठाण्यात आकाश वाटगुळे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत ३ सप्टेंबर रोजी पहाटे पावणेपाच वाजता आकाश गिरीधर वाटगुळे याला अटक केली. प्रकरणाचा पुढील तपास सेवाग्राम पोलिस करीत आहेत.




Petrol Price




