महत्वाच्या बातम्या

 आरोग्य महायज्ञात ४८ हजार २९६ नागरिकांना वैद्यकीय सेवा


- ६५० आरोग्य शिबिरांचे आयोजन; ५०६ रुग्ण पुढील उपचारांसाठी संदर्भित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या श्री गणेशा आरोग्य अभियान आणि सेवा संकल्प अभियानाला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. या अभियानांतर्गत २३ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात तब्बल ६५० आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये ४८ हजार २९६ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर पुढील उपचारांची आवश्यकता असलेल्या ५०६ रुग्णांना शासकीय व धर्मादाय रुग्णालयांमध्ये संदर्भित करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद गडचिरोली आणि जिल्हा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १५ सप्टेंबरपासून हे अभियान राबविण्यात आले. जिल्ह्यातील दुर्गम, ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळवून देणे तसेच आवश्यक औषधोपचार मोफत उपलब्ध करून देणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता.

महिला व बालकांचा मोठा सहभाग -
अभियानांतर्गत तपासणी करण्यात आलेल्या एकूण ४८ हजार २९६ नागरिकांमध्ये २० हजार ९०३ पुरुष, २१ हजार ३०३ महिला आणि ६ हजार ९० बालकांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध वयोगटांतील नागरिकांपर्यंत या आरोग्य अभियानाच्या सुविधा पोहोचल्याचे दिसून आले.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि विविध गणेश मंडळांच्या सहकार्याने आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

रक्ततपासणी, ईसीजीसह विविध आरोग्य सेवा -
या शिबिरांमध्ये प्राथमिक आरोग्य तपासणीसोबतच विविध आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. अभियानादरम्यान १० हजार ८९४ नागरिकांची मोफत रक्ततपासणी, तर १ हजार २०३ नागरिकांची ईसीजी चाचणी करण्यात आली.

आरोग्य अभियानाला सामाजिक बांधिलकीची जोड देत ६९० नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान केले. तसेच ८५ नागरिकांनी अवयवदानाची प्रतिज्ञा घेतली. नागरिकांना डिजिटल आरोग्य सुविधांशी जोडण्यासाठी २ हजार ३२ नागरिकांचे ‘आभा कार्ड’ तसेच १ हजार ८८२ नागरिकांचे ‘गोल्डन कार्ड’ तयार करण्यात आले.

५३ गंभीर रुग्णांना विशेष तपासणीसाठी पाठविले -
शिबिरांमध्ये तपासणी केल्यानंतर पुढील उपचारांची आवश्यकता असलेल्या ५०६ रुग्णांना शासकीय व धर्मादाय रुग्णालयांमध्ये संदर्भित करण्यात आले. त्यापैकी ५३ गंभीर रुग्णांना अँजिओग्राफी आणि इतर विशेष वैद्यकीय चाचण्यांसाठी पुढील उपचार केंद्रांकडे पाठविण्यात आले आहे. त्यामुळे गंभीर आजारांचे प्राथमिक टप्प्यावर निदान होऊन संबंधित रुग्णांना वेळेत पुढील उपचार मिळण्यास मदत झाली आहे.

पात्र रुग्णांना मोफत उपचार -
शिबिरांमध्ये गंभीर आजारांचे निदान झालेल्या पात्र रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी दिली.

विशेषतः दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सुविधांसाठी लांबचा प्रवास करावा लागू नये, यासाठी त्यांच्या परिसरातच आरोग्य शिबिरे घेण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, विविध तपासण्या, औषधोपचार तसेच पुढील उपचारासाठी संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

गणेश मंडळे, आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकांचे कौतुक -
या अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्यातील विविध गणेश मंडळांनी केलेले सहकार्य महत्त्वपूर्ण ठरले. आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच आशा स्वयंसेविकांनीही नागरिकांना शिबिरांपर्यंत आणण्यापासून ते तपासणी व मार्गदर्शनापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.

जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या वतीने या मोहिमेत सहकार्य करणाऱ्या सर्व गणेश मंडळे, आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. मोठ्या संख्येने नागरिकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणारे हे अभियान जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण उपक्रम ठरले आहे.





  Print






Related Photos