अज्ञात वाहनाच्या धडकेत ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू : चालक फरार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : नागभीड-नागपूर महामार्गावर नवखळा येथील एम.जी. महाविद्यालयासमोर अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना ३० ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी नागभीड पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लक्ष्मण महादेव मरघडे (वय ६०), रा. आंबेडकर वॉर्ड, नागभीड असे मृतकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण मरघडे हे नेहमी गावात तसेच मुख्य रस्त्यावर फिरत असत. ३० ऑक्टोबरच्या रात्री ते नवखळा येथील एम.जी. महाविद्यालयासमोरील नागभीड-नागपूर महामार्गावर फिरत असताना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, नागभीड येथे दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.
मृतकाचा मुलगा दीपक मरघडे यांच्या तक्रारीवरून नागभीड पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध हिट अँड रनचा गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नागभिड पोलीस करीत आहे.




Petrol Price




