महाराष्ट्राला ‘मनरेगा’चे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान, गडचिरोली ठरला मनरेगा अंतर्गत सर्वोत्कृष्ट कार्य करणारा जिल्हा


- ‘जलयुक्त शिवार’ व ‘मागेल त्याला शेततळे’योजनांचा सन्मान
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नवी दिल्ली :
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (मनरेगा)  अंतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी आज केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते महाराष्ट्राला विविध श्रेणीत चार पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.गडचिरोली जिल्हा हा मनरेगा अंतर्गत सर्वोउत्कृष्ट कार्य करणारा जिल्हा ठरला आहे. या जिल्ह्यास याप्रसंगी सन्मानित करण्यात आले. 
 येथील विज्ञान भवनात आज  केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा)’ पुरस्कार वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध श्रेणीत एकूण 237 पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राला रोजगार हमी योजनेच्या उत्कृष्ट अंमलबाजवणीसाठी राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत आणि पोस्ट ऑफीस अशा चार श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास केंद्रीय ग्रामीण विकास राज्य मंत्री राम कृपाल यादव, सचिव अमरजीत सिन्हा व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ व ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसह जलसिंचनात केलेल्या उत्तम कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी विभागाला आज पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार रोजगार हमी योजना आयुक्त ए.एस.आर. नाईक, रोहयो उपसचिव प्रमोद शिंदे व कमलकिशोर फुटाने यांनी स्वीकारला.
रोजगार हमी विभागाने आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये नैसर्गीक स्त्रोतांचे व्यवस्थापनांतर्गत एनआरएममध्ये एकूण 70 हजार 514 कामे पूर्ण केली आहेत. यासाठी 1451.74 कोटींचा व्यय झालेला आहे. एनआरएम अंतर्गत राज्य शासनाची महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार योजना’ व ‘मागेल त्याला शेततळे’ या योजना राबविण्यात आल्या व यामाध्यमातून मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. 

एनआरएम अंतर्गत 1451 कोटींची प्रमुख कामे
 
राज्यात नैसर्गिक स्त्रोतांचे व्यवस्थापन (एनआरएम) अंतर्गत झालेल्या 1451 कोटींच्या  प्रमुख कामांवर एक दृष्टीक्षेप :


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावळ यांनी 2 आक्टोबर 2016 रोजी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजना जाहीर केली. 
कृषी व वन विभागाला तांत्रिक व प्रशासकीय मंजुरीचे अधिकार दिले व त्याकरिता प्रमुख 11 योजना जाहीर केल्या, त्यामधील कृषी व जलसंधारण विषयक कामाच्या प्रमुख योजनांमध्ये ‘अहिल्यादेवी सिंचन विहीर’ योजनेंतर्गत 1 लाख 10 विहीरी घेण्यात आल्या, त्यामधून 5 लाख एकर संरक्षित सिंचन तयार झाले. ‘कल्पवृक्ष फळबाग योजने’मध्ये 78 हजार एकरवर फळबाग लागवड करण्यात आली. नरेगातून अंकूर रोपवाटीकेची कामे हाती घेण्यात आले यातंर्गत 9 कोटी रोपे तयार करण्यात आली, यामाध्यमातून राज्य शासनाच्या  13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेस बळकटी मिळाली.
नंदन वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत 8 लाख रोपांची लागवड करण्यात आली, अशाप्रकारे नैसर्गिक साधन संपत्ती विषयक कामांवर एकूण 1451 कोटी रुपये खर्च करण्यात आले .  


गडचिरोली जिल्ह्याचा सन्मान 

गडचिरोली जिल्हा हा मनरेगा अंतर्गत सर्वोउत्कृष्ट कार्य करणारा जिल्हा ठरला आहे. या जिल्ह्यास याप्रसंगी सन्मानित करण्यात आले.  रोजगार हमी आयुक्त तसेच गडचिरोली जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नाईक, सध्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंग, उपायुक्त के.एन.राव, उपमुख्यकार्यकारी अधिकारी जयंत बहरे, गटविकास अधिकारी एस.पी. पडघन यांनी पुरस्कार स्वीकारला.  आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 8 हजार 894 कामांना सुरुवात झाली. यातून दोन वर्षात 39.12 लाख मनुष्य दिन निर्मिती झाली. विद्यमान जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्या नेतृत्वात या आदिवासी बहुल जिल्हयामध्ये मनरेगाअंतर्गत वैयक्तीकामांवर भर देण्यात आले. जिल्हयात शेततळे, सिंचन विहीर, वर्मी कंपोस्ट आदी 6 हजार750 कामे पूर्ण झालेली आहेत.

नगरी ग्रामपंचायतीचा सन्मान

 मनरेगाच्या प्रभावी अंमलबजाणीसाठी गडचिरोली जिल्हयातीलच गडचिरोली ब्लॉक मधील ‘नगरी ग्रामपंचायती’ ला गौरविण्यात आले. सरपंच अजय मशाखेत्री आणि ग्रामसेवक राकेश शिवणकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या ग्रामपंचायतीने एनआरएमची विक्रमी 38 कामे पूर्ण केली. यामाध्यमातून गावात मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती झाली.

  नूतन प्रकाश  यांना उत्कृष्ट डाकसेवक पुरस्कार

 ठाणे जिल्हयातील खुटाघर येथील ग्राम डाकसेवक श्रीमती नुतन प्रकाश यांनी 2016-17 मध्ये स्थानीक रोजगार हमी योजनेत काम करणा-या जवळपास 300 मजुरांना 7 लाख रूपयांचे वितरण केले. त्यांच्या या सेवेसाठी त्यांना आज सन्मानित करण्यात आले.

पुण्यातील एमपीटीए संस्थेला तृतीय पुरस्कार

मनरेगा अंतर्गत दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य आधारीत  योजनेची  उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी  पुणे येथील एमपीटीए शिक्षण संस्थेला तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक सदानंद देशपांडे, सहायक उपाध्यक्ष अमोल वैद्य, संचालक प्रसाद कराडकर यांनी स्वीकारला.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-11


Related Photos