महत्वाच्या बातम्या

 राज्य सरकार ओरल हेल्थकेअरसाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करणार : उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस


- दंत महाविद्यालयाला अत्याधुनिक होस्टेल देणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :  मध्य भारतामध्ये नागपूर व परिसरात मोठ्या प्रमाणात मौखिक आजार ओरल डिसीज व कर्क रोगाचे कॅन्सरचे आजार बळावले आहेत. या परिसरात ओरल हेल्थकेअरसाठी सर्वसमावेशक उपचार पद्धती अस्तित्वात असणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य शासन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. शासकीय दंत महाविद्यालयातील म्युकरमायकोसिस रिहॅबिलेशन सेंटर ऑफ एक्सीलेंस थ्रीडी प्रिंटिंग इन डेंटिस्ट्री आदी विभागाच्या लोकार्पणानंतर उपस्थित वैद्यकीय विद्यार्थ्यांसमोर बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.राज गजभिये, शासकीय दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर, आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर उपस्थित होते. नागपूर , विदर्भ, मध्य भारताच्या भागांमध्ये पान, तंबाखू, खर्रा, गुटखा सेवनाच्या सवयीमुळे मोठ्या प्रमाणात मौखिक आजार व कॅन्सरचे रुग्ण वाढत आहे. मुख्यमंत्री असताना या संदर्भात डॉ. अभय बंग व डॉ राणी बंग यांच्या मदतीने गडचिरोली सारख्या भागातही या आजारांच्या संदर्भातील जनजागरण मोहीम राबविण्यात आली होती. मात्र या संदर्भात येणारी आकडेवारी भयावह असून दुर्दैवाने मध्य भारत या आजाराच्या अग्रस्थानी असल्याचे दिसून येते. त्यामुळे या संदर्भातील सर्वसमावेशक धोरण व हा आजार कमी करण्यासाठीची मोहीम राबविण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर शहरातील वैद्यकीय महाविद्यालय मेडिकल कॉलेज इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज मेयो शासकीय दंत महाविद्यालय हे सामान्यातल्या सामान्य नागरिकांना आपले वाटतात हे महत्त्वाचे आहे. मध्य भारतातील या आरोग्य केंद्रांना आता ५० ते १०० वर्षाचा कालावधी होत आहे. जिल्हाधिकारी डॉ. इटनकर रुजू झाल्यानंतर त्यांना या सर्व संस्थांच्या आवश्यकतांचा अभ्यास करायला सांगितले होते. त्यांच्याकडून एक सर्वसमावेशक प्रस्ताव सादर झाला आहे. त्यामुळे उत्तम पायाभूत सुविधा निर्माण करून गरिबांचे आशास्थान असणाऱ्या या उपचार केंद्रांना अधिक मजबूत व अद्यावत केले जाईल. नागपूर मेडिकल कॉलेजला अदयावती करण्यासाठी साडेतीनशे कोटी तर मेयो रुग्णालयाला तीनशे कोटी रुपये मंजूर केले असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच दंत महाविद्यालयाने गेल्या अनेक दिवसांपासून आधुनिक अशा वसतिगृहाची मागणी केली आहे. त्या वसतिगृहाच्या मागणीलाही मंजुरी देत असल्याची घोषणा त्यांनी आज येथे केली. नवे हॉस्पिटल, नवे हॉस्टेल सर्व मिळेल, मात्र दर्जा देखील तसाच ठेवा अशी सूचना त्यांनी यावेळी केली. यावेळी आमदार मोहन मते, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर राज गजभिये यांनीही यावेळी संबोधित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर यांनी तर संचालन डॉ. वैभव कारेमोरे यांनी केले.





  Print






News - Nagpur




Related Photos