महत्वाच्या बातम्या

 एनएचएम कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदांवर नियुक्तीचा निर्णय : १० वर्षांहून अधिक सेवा देणाऱ्यांना दिलासा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यभरात कार्यरत असलेल्या आणि १० वर्षे किंवा त्याहून अधिक सेवा पूर्ण केलेल्या पात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांना समकक्ष वेतनश्रेणीत अधिसंख्य पदे निर्माण करून नियुक्ती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. एक वेळची विशेष बाब म्हणून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सेवास्थैर्याच्या प्रतीक्षेत असलेल्या एनएचएम कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या निर्णयासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आमदारपदापासून ते खासदारपदापर्यंत सातत्याने पाठपुरावा केला. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न त्यांनी विविध वैधानिक माध्यमांतून शासनासमोर मांडला. विधानसभेतील सत्रे, तारांकित प्रश्न तसेच विविध संसदीय आणि वैधानिक आयुधांचा प्रभावी वापर करून त्यांनी या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले. याशिवाय, शासनस्तरावर सातत्याने बैठका घेऊन कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.

शासनाच्या निर्णयानुसार, २५ जून २०२६ पर्यंत तांत्रिक खंड वगळून १० वर्षे किंवा त्याहून अधिक सेवाकाळ पूर्ण केलेले पात्र कंत्राटी कर्मचारी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरणार आहेत. या कर्मचाऱ्यांसाठी समकक्ष वेतनश्रेणीत अधिसंख्य पदे निर्माण करून नियुक्ती देण्यात येणार आहे. त्यामुळे दीर्घकाळापासून कंत्राटी पद्धतीने सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत स्थैर्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निर्णयांतर्गत कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या वेतनाला पूर्ण संरक्षण देण्यात आले आहे. मूळ वेतनासह महागाई भत्ता आणि प्रवास भत्ता पूर्वीप्रमाणे लागू राहणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हिताचेही संरक्षण होणार आहे. अधिसंख्य पदांवरील कर्मचाऱ्यांची कमाल वयोमर्यादा ५८ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. संबंधित कर्मचारी सेवेत असेपर्यंतच हे पद अस्तित्वात राहील, तर कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीनंतर ते पद आपोआप व्यपगत होईल.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यसेवेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ संघर्षाला या निर्णयामुळे यश मिळाले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याने राज्यभरातील एनएचएम कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांचे आभार मानले आहेत.





  Print






Related Photos