कष्टाने पिकवलेल्या पिकांना पाणी देणारी मोटारच चोरट्यांनी पळवली : शेतकऱ्याचे २२ हजारांचे नुकसान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शेतात कष्टाने उभ्या केलेल्या धान पिकाला पाणी देण्यासाठी दिवसरात्र साथ देणारी विहिरीवरील पानबुडी मोटारच अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना विसापूर येथे उघडकीस आली. चोरट्यांनी मोटार काढण्यासाठी पाइप कापून केबल वायर तोडल्याने शेतकऱ्याचे २२ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, पिकांच्या सिंचनाची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
विसापूर येथील वार्ड क्रमांक ४ मधील श्रावण सुभाष हरणे हे शेती व्यवसाय करतात. त्यांच्या वडिलांच्या नावावर विसापूर शिवारात शेती आहे. या शेतीतील धान पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीवर क्रॉमटन कंपनीची ३ एचपी क्षमतेची पानबुडी मोटार बसविण्यात आली होती.
३० सप्टेंबर रोजी सायंकाळी हरणे यांचे वडील शेतात गेले होते. त्यांनी मोटारीच्या सहाय्याने धान पिकाला पाणी दिले आणि सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घरी परतले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पुन्हा शेतात गेले असता विहिरीजवळील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. मोटारीचा पाइप तुटलेला होता, केबल वायर कापलेली होती आणि विहिरीत मोटार कुठेच दिसत नव्हती.
घटनेची माहिती मिळताच श्रावण हरणे यांनी शेतात जाऊन पाहणी केली. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने विहिरीतून मोटार काढून पाइप कापला आणि वायर तोडून ती चोरून नेल्याचे स्पष्ट झाले असून तिची किंमत २२ हजार रुपये आहे.
शेतकऱ्यांसाठी सिंचनाची साधने ही केवळ यंत्रे नसून त्यांच्या पिकांच्या आशेचा आधार असतात. अशा परिस्थितीत पिकांना पाणी देणारी मोटारच चोरीला गेल्याने हरणे कुटुंबासमोर आर्थिक नुकसानासोबतच पिकांच्या सिंचनाचा प्रश्न उभा ठाकला आहे.
३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपासून १ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी श्रावण हरणे यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अजय झाडे करीत आहे.




Petrol Price




