सोलर लावुनही ग्राहकांना हजारो रूपयांची बिले !

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : वीजबिलाचा भार कमी व्हावा म्हणून लाखो रुपये खर्च करून घरांवर सौरऊर्जा प्रणाली बसविणाऱ्या ग्राहकांनाच आता हजारो रुपयांच्या वीजबिलाचा झटका बसत आहे. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेक ग्राहकांचे चार, सहा, तर काहींचे आठ महिन्यांपर्यंत नियमित मीटर रीडिंग घेण्यात आले नसल्याची तक्रार आहे. परिणामी अनेक महिन्यांचा वीजवापर एकाच वेळी बिलात जमा झाल्याने काही ग्राहकांना १० ते १२ हजार रुपयांपासून ५० हजार रुपयांहून अधिकची बिले मिळाली आहेत.
आरमोरी शहर व परिसरात स्मार्ट मीटर बसवल्यानंतर नियमित रीडिंगची प्रक्रिया विस्कळीत झाल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. रीडिंग वेळेत न घेतल्याने अनेक महिन्यांचा वीजवापर एकत्रितपणे आकारण्यात आला. याबाबत विचारणा केली असता मीटर रीडिंग घेण्यासाठी एजन्सी उपलब्ध नाही, असे कारण सांगण्यात येत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
रीडिंग प्रक्रियेत त्रुटी झाल्याचे महावितरणकडून मान्य करण्यात आल्याचे ग्राहकांचे म्हणणे असून, चुकीची बिले तातडीने दुरुस्त करून प्रत्यक्ष वीजवापरानुसार सुधारित बिले द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. तक्रारीचा निपटारा होईपर्यंत वीजपुरवठा खंडित करूनये, तसेचरीडिंगन घेण्यास जबाबदार अधिकारी, कर्मचारी अथवा संबंधित एजन्सीची जबाबदारी निश्चित करावी, अशीही मागणी आहे.
या मागण्यांचे निवेदन नंदू नाकतोड़े, धर्मेन्द्र जाऊंजालकर, मुकुल खेवले, डॉ. संजय कन्नमवार, अँड. अविनाश मुर्वत्कार, दिनेश जुआरे, डॉ. भूषण नखाते, अमर खरवड़े, नितिन निमगड़े, वनमाळी आदी सोलरधारकांनी वीज वितरण कंपनी, आरमोरीचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे सादर केले.




Petrol Price




