अवकाळी पावसाने भुईमुगाच्या पिकाला मिळाली नवसंजीवनी : शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित!


- आरमोरी, कुरखेडा, धानोरा व कोरची तालुक्यांतील नदीकाठच्या शेतांमध्ये भुईमुगाची जोमदार वाढ; तेलवर्गीय पिकाला बाजारपेठेत मागणी असल्याने लागवड क्षेत्रात वाढ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : तेलवर्गीय पिकांमध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या भुईमुगाच्या पिकाला गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढल्याने भुईमुगाच्या पिकाला नवसंजीवनी मिळाली असून, पिकाची वाढ जोमाने सुरू आहे. त्यामुळे आरमोरी, कुरखेडा, धानोरा आणि कोरची तालुक्यांतील भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील नदीकाठच्या परिसरात भुईमुगाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. नदीकाठची मिश्रित, भुसभुशीत व रेताड जमीन तसेच पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन भुईमूग लागवडीसाठी विशेष पोषक ठरते. त्यामुळे वैलोचना, गाढवी, सती आणि खोब्रागडी या नद्यांच्या काठावरील शेतांमध्ये या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. वैरागड परिसरातील शेतकरी रब्बी हंगामात भुईमूग लागवडीला विशेष प्राधान्य देत आहेत.
तेलवर्गीय पिकाला मागणी; लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल भुईमूग हे तेलवर्गीय नगदी पीक असल्याने बाजारपेठेत त्याला चांगली मागणी आहे.कमी कालावधीत उत्पादन देणारे आणि तुलनेने चांगला आर्थिक परतावा मिळवून देण्याची क्षमता असलेले हे पीक शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन ठरत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी पारंपरिक पिकांसोबत भुईमूग लागवडीकडेही वळत असून, लागवड क्षेत्रात वाढ होत असल्याचे चित्र आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे भुईमुगाच्या पिकाला आवश्यक ओलावा मिळाला आहे. पिकाच्या वाढीच्या टप्प्यावर हा पाऊस फायदेशीर ठरण्याची शक्यता असून, आगामी काळात चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
आरमोरी तालुक्यातील वैरागड, सुकाळा, मोहझरी, कोसरी, करपडा आणि डोंगरतमासी, तर कुरखेडा तालुक्यातील कढोली, भगवानपूर, वाढोणा, खरखडा आणि गांगुली या गावांसह धानोरा तालुक्यातील नदीकाठच्या अनेक गावांमध्ये भुईमुगाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या भागातील शेतांमध्ये सध्या भुईमुगाच्या पिकाची वाढ आणि मशागतीची कामे सुरू आहेत.
कढोली येथे महिला मजुरांकडून भुईमुगाच्या पिकाची बाह्य मशागत केली जात असून, अवकाळी पावसामुळे पिकाला मिळालेल्या ओलाव्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात भुईमुगाचे उत्पादन समाधानकारक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




Petrol Price




