महत्वाच्या बातम्या

 आमदार विनोद अग्रवाल यांच्या दणक्याने रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला गती : जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याची अंतिम मुदत निश्चित


- संथ गतीने सुरू असलेल्या बांधकामाबाबत आमदारांची उच्चस्तरीय बैठक; नोव्हेंबरपर्यंत पिलर, गर्डर, स्लॅब व अ‍ॅप्रोच रोडचे काम पूर्ण करण्याचे निर्देश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुन्या उड्डाणपुलाच्या ठिकाणी बांधण्यात येत असलेल्या नवीन रेल्वे उड्डाणपुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार विनोद अग्रवाल यांनी आक्रमक भूमिका घेत आज शासकीय विश्रामगृहात उच्चस्तरीय बैठक घेतली. बांधकामाला होत असलेला विलंब आणि त्यामुळे नागरिकांना सहन कराव्या लागत असलेल्या त्रासाची गंभीर दखल घेत आमदारांनी संबंधित अधिकारी तसेच बांधकाम संस्थेच्या प्रतिनिधींकडून कामाची प्रगती व येणाऱ्या अडचणींची सविस्तर माहिती घेतली. तसेच कामाला युद्धपातळीवर गती देण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संभाजी माने, अधीक्षक अभियंता नीता ठाकरे, कार्यकारी अभियंता रामटेके, कन्स्ट्रक्शन एजन्सीचे नागराळ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

आमदार विनोद अग्रवाल यांच्या उपस्थितीत मुख्य अभियंता संभाजी माने यांनी बांधकाम संस्थेकडून कामाला होत असलेल्या विलंबाबाबत जाब विचारला. बैठकीत उर्वरित बांधकामासाठी कालमर्यादाही निश्चित करण्यात आली. पिलर, गर्डर, स्लॅब तसेच अ‍ॅप्रोच सिमेंट रोडचे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून, रेल्वे मार्गावरील मुख्य भागाचे काम जानेवारी २०२७ अखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.

आमदार विनोद अग्रवाल यांनी स्पष्ट केले की, शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या उड्डाणपुलाच्या बांधकामात यापुढे कोणताही अनावश्यक विलंब खपवून घेतला जाणार नाही. संबंधित विभाग व बांधकाम संस्थेने आपापसांत समन्वय साधून कामात येणाऱ्या तांत्रिक अथवा प्रशासकीय अडचणी तातडीने दूर करून बांधकामाला गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

हड्डीटोली उड्डाणपुलाच्या कामालाही गती देण्याचे निर्देश -
बैठकीत हड्डीटोली उड्डाणपुलाच्या बांधकामाबाबतही आमदार विनोद अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. या कामालाही गती देण्यासोबतच सध्या सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामासोबतच रेल्वे मार्गावरील मुख्य भागाचे कामही समांतरपणे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जेणेकरून भविष्यात नागरिकांना पुन्हा वाहतूक कोंडी व वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागू नये.

रस्ते व इतर विकासकामांचे मुद्देही आमदारांनी मांडले -
आमदार विनोद अग्रवाल यांनी बैठक केवळ रेल्वे उड्डाणपुलापुरती मर्यादित न ठेवता गोंदिया शहर व विधानसभा क्षेत्राशी संबंधित इतर महत्त्वाच्या रस्ते व पुलांच्या बांधकामाचे मुद्देही अधिकाऱ्यांसमोर मांडले. प्रलंबित कामांना गती देणे, बांधकामातील अडचणींचे तातडीने निराकरण करणे तसेच नागरिकांना चांगली, सुरक्षित व सुरळीत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यावर त्यांनी विशेष भर दिला.





  Print






Related Photos