महत्वाच्या बातम्या

 भारतीय संविधान हे लोकशाहीचे संरक्षक कवच आहे : नितीन पवित्रकार


- विद्यापीठातील आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागात संविधान दिन संपन्न 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / अमरावती : भारतीय संविधान हे लोकशाहीचे संरक्षक कवच आहे, असे प्रतिपादन युवा संवाद प्रतिष्ठान, अमरावतीचे संस्थापक अध्यक्ष नितीन पवित्रकार यांनी केले. ते संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्यावतीने आयोजित संविधान दिन कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागाचे संचालक श्रीकांत पाटील, तर प्रमुख अतिथी म्हणून वैभव म्हस्के यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रारंभी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन व संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे वाचन करण्यात आले.

पवित्रकार पुढे म्हणाले की, भारतीय संविधान निर्माण करण्यासाठी मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढाकार आणि जबाबदारी स्वीकारुन सामाजिक व राजकीय स्तरावर स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वावर लोकशाही शासन व्यवस्थेची स्थापना केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दूरदृष्टी ठेवून भारतीयांना मतदानाचा अधिकार प्रदान करून भारताला लोकशाहीप्रधान शासन व्यवस्था बनविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. राज्यघटना तयार करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान निर्मितीमध्ये बहुजन, दलितांच्या समस्या या सर्वांचा विचार करून त्यांच्या उन्नतीचे मार्ग खुले केले. भारतीय संविधान सर्वांगीण उन्नतीचा आराखडा असून १४० कोटी लोकसंख्या असलेला देश भौगोलिक आणि भाषिक विविधतेने पूर्ण असला तरी संपूर्ण देशाला एकत्रित बांधण्याचे कार्य राज्यघटनेने केलेे आहे. देशाच्या नागरिकांना जबाबदार आणि कर्तव्यमुख बनविण्यासाठी संविधान महत्त्वाचा राष्ट्रीय ग्रंथ आहे, जो न्यायव्यवस्था, कार्यकारी व्यवस्था आणि कायदे व्यवस्था यांच्यात प्राण फुंकण्याचे काम करतो.

प्रमुख अतिथी वैभव म्हस्के म्हणाले, मसुदा समितीच्या सदस्यांनी अनेक देशांच्या घटनेचा तुलनात्मक अभ्यास करून भारताच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि प्रादेशिक वैविधतेचा विचार करून सर्व जाती-धर्माच्या लोकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता निर्मण होण्यासाठी प्रयत्न केले. संविधानाची उद्देशपत्रिका ही संविधानाचे ह्मदय आहे. संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे वाचन करून सर्वांनी आचरणात आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील म्हणाले की, संविधानाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर भारताची नवी ओळख निर्माण झाली आहे. सार्वभौम, समाजवाद या शब्दाचा अर्थ नव्या पिढीला कळणे आवश्यक आहे, त्यामुळे त्यांना इतिहासाचे ज्ञान होईल. संविधान नसते तर काय झाले असते ही कल्पनाच भयावह आहे. संविधानातील दिलेले कर्तव्याचे सर्वांनी पालन करावे, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे  प्रास्ताविक  प्रा. सुरेश पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक डॉ. प्रशांत भगत, प्रा. वैभव जिसकार यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला प्रा. आदित्य पुंड, प्रा. स्वप्नील मोरे, प्रा. मनिषा लाकडे, प्रा. वहाणे, प्रा. ओलीवकर आदिंची उपस्थिती होती.





  Print






News - Rajy




Related Photos