सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंजच्या जनजागृती सत्राचे नागपूर येथे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : राज्यातील विद्यार्थी, युवक, नवसंशोधक, स्टार्टअप्स आणि उद्योजकांना नाविन्यपूर्ण कल्पना व समस्यांवरील प्रभावी उपाययोजना मांडण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत सेवा संकल्प अभियान अंतर्गत - सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाची माहिती अधिकाधिक इच्छुकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी (MSInS) यांच्या वतीने गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६ रोजी नागपूर येथील वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालय, वैनगंगा इन्क्युबेशन फाउंडेशन, डोंगरगाव, पोस्ट गुमगाव, वर्धा रोड, नागपूर येथे दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत विशेष जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या स्थानिक आयोजन व समन्वयासाठी भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर (IIM Nagpur) यांचे सहकार्य लाभणार आहे.
या सत्रामध्ये सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज या उपक्रमाची उद्दिष्टे, सहभागासाठीच्या संधी, नाविन्यपूर्ण कल्पना सादर करण्याची प्रक्रिया तसेच उपक्रमाशी संबंधित विविध बाबींची माहिती देण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संबंधित भागधारकांशी संवाद साधून उपक्रमाविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी, नवसंशोधक, नवउद्योजक, स्टार्टअप प्रतिनिधी तसेच नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या इच्छुकांनी या सत्रात सहभागी होऊन उपक्रमाची माहिती घ्यावी. तसेच जिल्ह्यातील महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), इनक्युबेशन केंद्रे, स्टार्टअप्स, उद्योजक आणि संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींनी या उपक्रमाची माहिती पात्र व इच्छुकांपर्यंत पोहोचवून त्यांना सहभागासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
या जनजागृती सत्राच्या माध्यमातून राज्यातील नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन मिळून विद्यार्थ्यांमध्ये, युवकांमध्ये आणि नवउद्योजकांमध्ये नवसंशोधन व उद्योजकतेची भावना अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. असे सहय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी कळविले आहे.




Petrol Price




