एसआयआर मोहीम : दावे व हरकतींसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

- नोटीस मिळालेल्या मतदारांना तहसील कार्यालयात येण्याची गरज नाही
- मतदान केंद्रे, महाविद्यालये, उद्योग व विविध ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर)-२०२६ अंतर्गत दावे व हरकती दाखल करण्यासाठी आता १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच ‘नो मॅपिंग’ अथवा तार्किक विसंगतीमुळे नोटीस मिळालेल्या मतदारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी तहसील कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसून, संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांच्या घरी भेट देऊन आवश्यक कागदपत्रे संकलित करणार आहेत.
मतदार यादीतील जुळवणी न झालेल्या अथवा तार्किक विसंगती असलेल्या मतदारांना नोटीस प्राप्त झाली असल्यास त्यांनी मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ), सहायक मतदार नोंदणी अधिकारी (एईआरओ) अथवा तहसील कार्यालयात प्रत्यक्ष सुनावणीसाठी येण्याची आवश्यकता नाही. यापूर्वी नोटीस मिळालेल्या मतदारांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. संबंधित बीएलओ मतदारांच्या घरी भेट देऊन ती संकलित करतील. मतदारांना व्हॉट्सअप अथवा उपलब्ध ऑनलाइन माध्यमातूनही कागदपत्रे सादर करता येतील.
तार्किक विसंगती असलेल्या प्रकरणांत केवळ संबंधित विसंगतीपुरती आवश्यक कागदपत्रे, बीएलओचा पडताळणी अहवाल अथवा पंचनाम्याच्या आधारे निर्णय घेण्यात येईल. विहित कागदपत्रे उपलब्ध नसतील किंवा सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे निर्णय घेणे शक्य नसेल, अशा अपवादात्मक प्रकरणांत शक्यतो ऑनलाइन सुनावणी घेतली जाईल. सुनावणीस संबंधित मतदार किंवा त्यांच्या कुटुंबातील प्रौढ व्यक्ती उपस्थित राहू शकेल.
अंतिम निर्णयापूर्वी मतदाराला आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची पुरेशी संधी दिली जाईल. तसेच आवश्यक प्रकरणांची माहिती राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना देऊन कागदपत्रे उपलब्ध करून घेण्यासाठी पुरेसा कालावधी दिला जाणार आहे. ३, ४, १० व ११ ऑक्टोबरला मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे : दावे व हरकतींच्या वाढीव कालावधीत एकही पात्र मतदार वंचित राहू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर ३ व ४ ऑक्टोबर तसेच १० व ११ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या दिवशी संबंधित बीएलओ मतदान केंद्रावर उपस्थित राहतील. शिबिरांमध्ये नवीन मतदारांची नमुना ६ द्वारे नोंदणी, प्रारूप मतदार यादीतील नावाची पडताळणी, आवश्यक दुरुस्ती व सुधारणा करण्यासाठी नमुना ८, तसेच नोटीस प्राप्त मतदारांची आवश्यक कागदपत्रे स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध असेल.
५ ते ९ ऑक्टोबरदरम्यान महाविद्यालयांमध्ये नोंदणी मोहीम : जिल्ह्यातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये ५ ते ९ ऑक्टोबरदरम्यान विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी नमुना ६ द्वारे ऑनलाइन करण्यावर भर दिला जाणार आहे. औद्योगिक आस्थापना, कंपन्या, कारखाने तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील पात्र नागरिकांची नोंदणी सुलभ करण्यासाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मतदार जागृती मंचाच्या माध्यमातून विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
घरबसल्या ऑनलाइन सुविधांचा लाभ घ्या : मतदारांना प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासणे, नवीन नोंदणीसाठी नमुना ६ तसेच दुरुस्तीसाठी नमुना ८ ऑनलाइन भरता येणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाचे Voters Services Portal तसेच ECINET आणि Voter Helpline App या डिजिटल सुविधांचा वापर करता येईल. एसआयआर संदर्भात शंका, मतदार यादी, नोटीस, नोंदणी अथवा शिबिरांची माहिती मिळविण्यासाठी १९५० मतदार हेल्पलाईन उपलब्ध आहे.
पात्र मतदाराचे नाव घाईगडबडीने वगळले जाणार नाही : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोणताही पात्र मतदार, मतदार यादीतील समावेशनापासून वंचित राहणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पुरेशा पुराव्याअभावी कोणताही प्रतिकूल निर्णय घेण्यापूर्वी संबंधित मतदाराला आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची आणि आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे.
त्यामुळे नोटीस मिळालेल्या मतदारांनी घाबरून तहसील कार्यालयात गर्दी करू नये. नागरिकांनी आपल्या मतदान केंद्रावरील बीएलओशी संपर्क साधावा, आयोजित विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा किंवा ऑनलाइन सुविधांचा वापर करावा. कोणत्याही अफवा अथवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.




Petrol Price




