विहिरीवर शेळ्यांसाठी पाणी आणायला गेलेल्या दहावीतील विद्यार्थिनीचा पाय घसरून मृत्यू
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यातील पवनी तालुक्यातून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.
बराच वेळ दहावीतील शिकणारी घरातली मुलगी परतली नाही म्हणून आईने शोधाशोध करायला सुरुवात केली. एका विहिरीपाशी आईला मुलीच्या चपला आढळून आल्या. त्यामुळे आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. अखेर विहिरीकडे जाऊन पाहिलेही. पण विहिरीच्या पाण्यात मुलगी दिसली नाही. दरम्यान, गावकऱ्यांच्या मदतीने शोध घेतला असताना मुलगी विहिरीच्या पाण्यात बुडाल्याचे उघडकीस आले. दहावीतील विद्यार्थीनीच्या मृत्यूने आता संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शेळ्यांसाठी पाणी आणण्यासाठी गेलेल्या दहावीतील विद्यार्थिनीचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील चिचाळ येथे घडली. सलोनी विनोद नखाते (16) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या विद्यार्थीनीवर शोकाकुल वातावरणात चिचाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सलोनी ही चिचाळ येथील जिल्हा परिषद विद्यालयात दहाव्या वर्गात शिकत होती. विनोद नखाते पत्नी संगीतासोबत बटईने केलेल्या शेतावर शेळ्या घेऊन गेले होते. तर सलोनी सकाळची शाळा आटोपून आईवडील असलेल्या शेतात गेली.
त्यावेळी आईने तिला शेळ्यांसाठी पाणी आणण्यासाठी शेताच्या दुसऱ्या टोकावर असलेल्या विहिरीवर पाठविले. विहिरीतून बादलीने पाणी काढताना सलोनीचा पाय घसरला आणि ती विहिरीत पडली.
मुलगी अद्याप का आली नाही म्हणून आईने विहिरीकडे जाऊन बघितले. तेव्हा विहिरीच्या काठावर सलोनीच्या चपला दिसल्या. मुलगी विहिरीत पडल्याचे लक्षात येताच आईने आरडाओरड सुरू केला. वडीलही विहिरीकडे धावले.
विहिरीत बघितले असता सलोनी दिसली नाही. दरम्यान, गावकऱ्यांनीही शेताकडे धाव घेतली. घटनेची माहिती अड्याळ पोलिसांना देण्यात आली असता ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत शोध घेण्यात आला. त्यानंतर सलोनीचा मृतदेह विहिरतून बाहेर काढण्यात आला.
यावेळी गावकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. सलोनीचा मृतदेह अड्याळ ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी पाठविन्यात आला असून अड्याळ पोलिसांनी आकस्मित मृत्युची नोंद केली आहे. दहावीतील मुलीच्या मृत्यूने सलोनीच्या आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.
News - Bhandara