संभाव्य पाणीटंचाईसाठी गावनिहाय नियोजन करा : सुहास गाडे

पिण्याच्या पाण्याला प्राधान्य; गळती रोखून पाणीबचतीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : दुष्काळी प्रभावामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्यास जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना पुरेसे व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जलस्रोतांची पाहणी करून गावनिहाय पाणीपुरवठा आराखडे तयार करावेत. तसेच गळती व अनावश्यक वापर रोखून उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी दिले आहेत.
जिल्हास्तरीय पाणीटंचाई निवारण समितीचे निर्देश आणि शासनाच्या सूचनांनुसार सुहास गाडे यांनी सर्व गटविकास अधिकारी व संबंधित पाणीपुरवठा यंत्रणांना आवश्यक कार्यवाहीच्या सूचना दिल्या. यानुसार गावांमधील विहिरी, तलाव, धरणे, बंधारे व इतर जलस्रोतांतील पाणीसाठा, लोकसंख्या आणि दैनंदिन गरज विचारात घेऊन उपलब्ध पाणी ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरेल, अशा पद्धतीने नियोजन करने व पाणी वितरणात पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचीही सांगण्यात आले.
शासनाने लागू केलेल्या पाणीवापरातील १० टक्के कपातीची अंमलबजावणी करताना नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या मूलभूत गरजा बाधित होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. यासाठी पाणीपुरवठा योजनांमधील गळती रोखणे, अनावश्यक पाणीवापरावर नियंत्रण ठेवणे आणि नागरिकांमध्ये पाणीबचतीबाबत जनजागृती करणे या उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
संभाव्य टंचाईग्रस्त गावांची यादी तयार करून आवश्यकतेनुसार नळ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती, नवीन विंधन विहिरी, स्रोत बळकटीकरण, विहिरींचे खोलीकरण व गाळ काढणे, तसेच विंधन विहिरींच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. पंप, विद्युत उपकरणे आणि पाणी वितरण व्यवस्थेतील बिघाड त्वरित दूर करावेत. प्रत्येक ग्रामपंचायतीने उपलब्ध जलसाठा, पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक आणि संभाव्य टंचाईचा नियमित आढावा घेण्याची त्यांनी सांगितले.
पावसाचे पाणी साठवणे, छतावरील पावसाच्या पाण्याचे संधारण, भूजल पुनर्भरण, जलसंधारण आणि पाण्याचा पुनर्वापर याबाबत जनजागृती करावी. संबंधित समित्यांनी टंचाई निवारणाच्या उपाययोजना आणि पाणीवापर कपातीसाठी केलेल्या कार्यवाहीचा नियमित आढावा घ्यावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय राखून या उपाययोजनांची प्राधान्याने अंमलबजावणी करावी.
अंमलबजावणीत विलंब किंवा निष्काळजीपणा आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही गाडे यांनी स्पष्ट केले असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद उद्धरवार यांनी कळविले आहे.




Petrol Price




