रुग्णांच्या जिवाशीच खेळ : मेयो, मेडिकल मधील लाखाहून अधिक ताप, रक्तदाबाची औषधे नापास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : गोरगरीब आणि सर्वसामान्य रुग्णांचा आधारवड मानल्या जाणाऱ्या नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे शासकीय पुरवठ्यांतर्गत आलेल्या ताप आणि रक्तदाबावरील औषधांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) घेतलेल्या नमुन्यांच्या प्रयोगशाळा तपासणीत संबंधित औषधे निर्धारित गुणवत्ता निकषांनुसार नसल्याचे आढळून आले आहे. अहवाल प्राप्त होताच या औषधांचा वापर व वितरण तातडीने थांबविण्याचे तसेच उपलब्ध साठा परत मागवून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या प्रकारामुळे शासकीय रुग्णालयांमधील औषधांच्या गुणवत्तेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आधीच अनेकदा औषधांच्या तुटवड्याला सामोरे जाणाऱ्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध झालेला औषधसाठाच गुणवत्ता तपासणीत अपयशी ठरल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
ऑगस्टमध्ये एफडीएने घेतले होते नमुने -
ऑगस्ट महिन्यात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मेयो रुग्णालयातून संबंधित औषधांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. या नमुन्यांचा प्रयोगशाळा तपासणी अहवाल १० सप्टेंबर रोजी प्राप्त झाला. त्यामध्ये दोन्ही औषधांचे नमुने प्रमाणित दर्जाचे नसल्याचे स्पष्ट झाले.
पीटीटीसी-१०८ या बॅचचे पॅरासेव्ह ५०० (पॅरासिटामॉल) या औषधाच्या नमुन्याची तपासणी केली असता त्याचे बाह्य स्वरूप निर्धारित निकषांनुसार नसल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित बॅच गुणवत्ता तपासणीत नापास ठरली आहे.याशिवाय सीएचपीएलटी ४१६ या बॅचच्या टेलमिसार्टन ४० मि.ग्रॅ. या रक्तदाबावरील औषधाचा नमुनाही निर्धारित गुणवत्ता निकषांमध्ये अपयशी ठरला आहे. त्यामुळे या दोन्ही औषधांच्या उपलब्ध साठ्याच्या वापराबाबत तातडीने खबरदारी घेण्यात आली आहे.
मेडिकल मध्येही वापराला तत्काळ ब्रेक -
मेयो रुग्णालयाकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात मेडिकलने पॅरासेव्ह ५०० च्या ५० हजारांहून अधिक गोळ्यांचा साठा घेतला होता. एफडीएच्या तपासणी अहवालाची माहिती मिळताच मेडिकल प्रशासनाने या औषधांच्या वापरावर तातडीने निर्बंध घातले.
मेडिकलच्या औषधनिर्माणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अविनाश तुरणकर यांनी सर्व वॉर्ड तसेच बाह्यरुग्ण विभागांना (ओपीडी) संबंधित गोळ्यांचे वितरण त्वरित थांबविण्याचे लेखी निर्देश दिले आहेत. तसेच उपलब्ध असलेला साठा परत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. डॉ. तुरणकर यांनी या कारवाईला दुजोरा दिला आहे.
एफडीएकडून मेयो प्रशासनाला नोटीस -
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने मेयो रुग्णालयाच्या प्रशासनाला औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यानुसार नोटीस बजावली आहे. संबंधित औषधांच्या खरेदी, विक्री आणि वितरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे तीन दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.या औषधांचा शासकीय रुग्णालयात नेमका किती साठा आला, त्यातील किती औषधांचे वितरण झाले आणि किती साठा अद्याप उपलब्ध आहे, याची माहितीही या प्रक्रियेतून समोर येण्याची शक्यता आहे.
गोरगरीब रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न -
शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी मोठ्या संख्येने आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्ण येतात. औषधांची उपलब्धता ही त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. अनेकदा औषधांचा तुटवडा निर्माण होत असल्याच्या तक्रारी असताना उपलब्ध औषधसाठ्यातील काही नमुने गुणवत्ता तपासणीत नापास होणे ही बाब गंभीर मानली जात आहे.
औषधांचा दर्जा हा थेट रुग्णांच्या उपचाराशी संबंधित असल्याने संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोष निश्चित करण्याची मागणी होत आहे. संबंधित औषध उत्पादक कंपनीविरुद्ध नियमानुसार कोणती कारवाई केली जाणार, तसेच कंपनीला काळ्या यादीत टाकण्याबाबत निर्णय होणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.
नियमित तपासणीचा दावा -
शासकीय रुग्णालयांमधील औषधांची नियमित तपासणी केली जात असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या क्युरेजा हेल्थकेअरच्या पॅरासिटामॉल आणि टेलमिसार्टन या औषधांच्या नमुन्यांचा अहवाल प्रमाणित दर्जाचा नसल्याचे प्राप्त झाले. या अहवालाची गंभीर दखल घेऊन संबंधित औषधांचे वितरण तत्काळ थांबविण्याचे आणि उपलब्ध साठा परत मागवून घेण्याचे आदेश रुग्णालयांना देण्यात आले आहेत.
औषधांचा वापर थांबविण्याची तातडीची कारवाई करण्यात आली असली तरी या औषधांचा पुरवठा कोणत्या प्रक्रियेतून झाला, गुणवत्ता तपासणी कोणत्या टप्प्यावर झाली आणि संबंधित औषधे रुग्णालयापर्यंत पोहोचेपर्यंत गुणवत्ता नियंत्रणात काही त्रुटी राहिल्या का, याची उत्तरे आता तपासणीअंती स्पष्ट होणार आहेत.




Petrol Price




