झारखंडमध्ये लोक जनशक्ती पक्ष स्वतंत्र निवडणुक लढणार ; भाजपला झटका


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
झारखंडमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) जोरदार झटका बसला आहे. 'एनडीए'मध्ये फूट पडली असून आगामी विधानसभा निवडणुकीत लोक जनशक्ती पक्ष (लोजप) स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे.
झारखंडमध्ये विधानसभेच्या एकूण ८१ जागांसाठी निवडणूक होत असून एकूण पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. राज्यात लोक जनशक्ती पक्ष स्वतंत्र लढणार असल्याचे संकेत पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष चिराग पासवान यांनी सोमवारी दिले होते. त्यांचा पक्ष आतापर्यंत भाजपच्या नेतृत्वाखाली 'एनडीए'चा भाग होता. लोजपने 'एनडीए'चा सहकारी पक्ष म्हणून सहा जागांची मागणी केली होती. मात्र रविवारी भाजपने आपल्या ५२  उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यावर आम्ही झारखंडमध्ये स्वतंत्र लढण्यासाठी तयार आहोत, असे चिराग पासवान यांनी सोमवारी सांगितले होते.
आम्ही यावेळी टोकनच्या स्वरूपात दिलेल्या जागांचा स्वीकार करणार नाही. आम्ही सहकारी पक्ष म्हणून सहा जागांची मागणी केली होती. रविवारी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यांतील अनेक जागांची मागणी आम्ही केली होती,' असे चिराग पासवान म्हणाले.
झारखंडमध्ये 'एनडीए'तील आणखी एक घटक पक्ष असलेल्या ऑल झारखंड स्टुडंट युनियनने (एजेएसयू) सोमवारी भाजपशी चर्चा न करता १२ जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यांतील तीन जागांसाठी भाजपकडूनही उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यावर आम्ही ज्या ठिकाणी मजबूत आहोत, त्या जागा भाजप देत नाही, असे 'एजेएसयू'कडून सांगण्यात आले.
झारखंड विधानसभेच्या एकूण ८१ जागांसाठी पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. मतमोजणी २३ डिसेंबरला होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान ३०  नोव्हेंबरला, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ७ डिसेंबरला होणार आहे. १२  डिसेंबरला तिसरा टप्पा, १६ डिसेंबरला चौथा टप्पा आणि २० डिसेंबरला पाचव्या टप्प्यात मतदान होईल.  Print


News - World | Posted : 2019-11-13


Related Photos