महत्वाच्या बातम्या

 नागपूर : गोळीबार व हाणामारी प्रकरणात सहा जणांना अटक


- गोळी झाडणाऱ्या मृणालच्या वडिलांनादेखील अटक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : एमडी तस्करीवरून सुरू असलेल्या वर्चस्वाच्या वादातून सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. गोळीबार झाल्यानंतर गोळी झाडणाऱ्याच्या कुटुंबियांनी एका बेदम मारहाणदेखील केली होती.

या गोळीबार व हाणामारी प्रकरणात पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून एकूण सहा जणांना अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये गोळी झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांचादेखील समावेश आहे.

मृणाल मयूर गजभिये (३०) आनंद नगर असे मुख्य आरोपीचे नाव असून जैनुलऊद्दीन सलीम कुरेशी (३१) रा. गड्डीगोदाम, सदर असे जखमी गुन्हेगाराचे नाव आहे. एमडी तस्करीच्या पैशावरून मृणाल आणि कुरेशीमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता. कुरेशीने म-णालला धमकावत पैसे मागण्यास सुरुवात केली. बुधवारी सकाळी ७.३० वाजता कुरेशी हा साथीदार नितीन संतोष गुप्ता (२९) बुटी चाळ, गड्डीगोदाम चौक, राहुल उर्फ गोलू गोंडाणे (२२) इंदोरा चौक, पाचपावली आणि समीर दुधानकर (हुडकेश्वर) यांच्यासह मृणालच्या घरी पोहोचला. त्याने मृणालला बोलण्यासाठी घराबाहेर बोलावले. तो आल्यानंतर चौघांमध्ये वाद सुरू झाला.

कुरेशीने त्याच्याकडे पैसे मागितले. वाद वाढल्यावर मृणालने माऊझर बाहेर काढला व गोळीबार केला. पहिली गोळी भिंतीला लागली. नितीनने माऊझर पकडण्याचा प्रयत्न केला व त्यात कुरेशीच्या पोटात गोळी झाडली गेली. यानंतर कुरेशीने माऊझर हिसकावत घटनास्थळावरून पळ काढला. तर मृणालचे वडिल मयुर लक्ष्मण गजभिये (५१), अंशुल जगतनारायण सिंग (२६) गोवा कॉलनी, मंगळवारी व राजा खान अब्दुल गफार (३१) गोवा कॉलनी, मंगळवारी बाजार यांनी नितीनला पकडून मारहाण केली. या सिताबर्डी पोलिसांना बराच वेळ या घटनेची माहिती मिळू शकली नाही. सकाळी १०.३० वाजता रुग्णालयातून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची धावपळ उडाली. नितीन गुप्ता याच्या तक्रारीवरून सिताबर्डी पोलीस ठाण्यात मृणाल, मयूर गजभिये, अंशुल व राजा खानविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला व त्यांना अटक करण्यात आली. तर मृणालच्या तक्रारीवरून कुरेशी, नितीन गुप्ता, राहुल गोंडाणे व समीर दुधानकरविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. कुरेशीवर उपचार सुरू असल्याने त्याला वगळता नितीन व राहुलला अटक करण्यात आली.

माऊझर व काडतुसे कुठून आली ?

निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्याने पोलिसांनी परवाना असलेल्या शस्त्रधारकांची शस्त्रे जप्त केली आहे. मात्र शहरात अनेकांकडे अवैध अग्निशस्त्रे आहेत. मृणाल हा सराईत गुन्हेगार असून तुरुंगातून जामिनावर बाहेर आला होता. त्याच्याकडे माऊझर कुठून आले याचा पोलीस शोध घेत आहेत.





  Print






News - Nagpur




Related Photos