स्वच्छता गृहाअभावी महिलांची कुचंबणा : बल्लारपूरच्या व्यापारी संकुलांत सुविधेची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, शहरातील अनेक व्यापारी व व्यावसायिक संकुलांमध्ये स्वच्छतागृहांची पुरेशी व्यवस्था नसल्याने विशेषतः महिलांची मोठी गैरसोय होत आहे. कुठे स्वच्छतागृहच नाही, तर कुठे असलेली सुविधा अस्वच्छतेमुळे वापरण्यायोग्य राहिलेली नाही. या गंभीर समस्येकडे नगर परिषद प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन शहरातील सर्व व्यापारी संकुलांमध्ये महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी, अशी मागणी वंचित बहुजन महिला आघाडीने केली आहे.
यासंदर्भात ७ ऑक्टोबर रोजी बल्लारपूर नगर परिषदेला निवेदन देण्यात आले. बालाजी कॉम्प्लेक्स, व्यंकटेश एम्पायर, अर्जुना कॉम्प्लेक्स यांसह नगर प्रशासनाच्या माहितीत असलेल्या इतर व्यापारी संकुलांमध्ये येत्या पंधरा दिवसांत स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
शहरातील व्यापारी संकुलांमध्ये दररोज मोठ्या संख्येने नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, ग्राहक, व्यापारी आणि कर्मचारी ये-जा करतात. मात्र, स्वच्छतागृहांच्या अभावामुळे त्यांना अनेकदा गैरसोयीचा सामना करावा लागतो. उपलब्ध असलेल्या स्वच्छतागृहांची स्वच्छता व देखभाल योग्य पद्धतीने होत नसल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी मूलभूत सुविधा असणे हा नागरिकांचा अधिकार असताना स्वच्छतागृहांसारख्या अत्यावश्यक सुविधेसाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची खंत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
विशेषतः महिलांसाठी ही समस्या अधिक संवेदनशील आहे. बाजारपेठेत किंवा व्यापारी संकुलात काही काळ थांबावे लागल्यास स्वच्छतागृह उपलब्ध नसल्याने महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे महिला सन्मान आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
वंचित बहुजन महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रेखाताई पागडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष उमेश कडू उपस्थित होते. शहर महासचिव गौतम रामटेके, शहर संघटक राकेश पेटकर, पराग जांभुळकर, प्रकाश रामटेके, आयटी प्रमुख प्रियंकेश शिंगाडे, युवा तालुकाध्यक्ष अभिलाष चूनारकर, मनोज रघुवंशी, सूरज शृंगारे, आशाताई भाले, अनिता शंभरकर, संगीता मजगवळी, अनुकला वाघमारे, सुनील साठे, संदीप ताकसांडे, राकेश निमसटकर, राहुल डांगे, सुमित भाले, संघमित्रा दुर्योधन, श्रावस्ती खोब्रागडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शहरातील व्यापारी संकुलांमध्ये स्वच्छतागृहांची व्यवस्था करून त्यांची नियमित स्वच्छता व देखभाल सुनिश्चित करावी, तसेच यासाठी नगर परिषद प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.




Petrol Price




