महत्वाच्या बातम्या

 मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळ्यासाठी प्रत्येकी ७५ हजारांचे अनुदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : कृषी आयुक्तालयाच्या चालू वर्षांतर्गत मार्गदर्शक सूचनानुसार मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत नागपूर विभागास १ हजार ३६० शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे मिळणार आहेत. तसेच विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी कमाल रक्कम ७५ हजार रुपये रकमेच्या मर्यादेत अनुदान देय राहील. या योजनेअंतर्गत समाविष्ट विविध आकारमानाच्या शेततळ्यापैकी कोणत्याही एका शेततळ्याकरिता मागणी अर्ज महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन पध्दतीने भरल्यानंतर लॉटरी पध्दतीने लाभार्थ्यांची निवड होईल.

ऑनलाईन अर्ज मोबाईल, लॅपटॉप, सामुदायिक सेवा केंद्र, ग्रामपंचायती मधील सामुदायिक सेवा केंद्र यासारख्या माध्यमातून http://mahadbtmahit.gov.in या संकेतस्थळावर जाऊन करता येतो.

शेततळयाचा लाभ संरक्षित सिंचन क्षेत्रासाठी रब्बी, उन्हाळी पिकांना सरंक्षित पाणी देण्यासाठी होऊ शकेल, त्याचप्रमाणे मत्स्यपालन पशुसंवर्धनासाठी होऊ शकेल. त्यासाठी २३ रुपये ६० पैसे शुल्क ऑनलाईन भरावयाचे आहे. सोडतीतून निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्याच्या जमिनीचा सातबारा, अ उतारा, आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, हमीपत्र, जातीचा दाखला महा डीबीटी पोर्टलवर विहीत मुदतीत अपलोड करावा लागेल.

निवड झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात कृषी अधिकारी भेट देतील, तसेच छाननी अंती पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना कार्यरंभ आदेश ऑनलाईन पध्दतीने निर्गमित करण्यात येईल. शेततळ्याला लागणारी जागा शेतकऱ्यांनी स्वखुशीने व विनामुल्य द्यावयाची आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांनी यापूर्वी कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे व सामुहिक शेततळे या घटकाकरिता लाभ घेतलेला नसावा.

महा डीबीटी प्रणालीवर एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांचे अर्ज येतात, त्यामुळे ज्यांची निवड झाली ते वगळून उर्वरित शेतकऱ्यांची प्रतिक्षा यादी लावली जाते. त्यानुसार टप्याटप्प्याने त्यांची निवड केली जात असल्यामुळे प्रत्येकवेळी संबंधीत शेतकऱ्यांनी अर्ज करावयाची आवश्यकता नाही.

इच्छुक लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर मुदतीत मोठ्या प्रमाणात अर्ज करण्यासाठी आवाहन विभागीय कृषी सहसंचालक यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos