महत्वाच्या बातम्या

 केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी : पोलिस विभागात खळबळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दोन महिन्यापूर्वी कर्नाटकातील बेळगावच्या कारागृहातील एका कुख्यात आरोपीने धमकी देणारे तीन फोन केले होते. त्यानंतर पुन्हा त्याच आरोपीचे नाव सांगून मंगळवारी सकाळी गडकरींना धमकी देऊन १० कोटींची मागणी करण्यात आली आहे. या फोन कॉलमुळे पोलिस यंत्रणा खळबळून जागी झाली आहे.

दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना बेळगाव येथील कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या जयेश नावाच्या आरोपीने १४ जानेवारी २०२३ रोजी धमकीचे तीन फोन केले होते. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. नागपूर पोलिस बेळगावला आरोपीच्या चौकशीसाठी गेले होते. त्यानंतर आज २१ मार्चला सकाळच्या सुमारास पुन्हा गडकरींच्या खामला चौकातील कार्यालयात धमकी देणारे दोन फोन करण्यात आले.

धमकी देणाऱ्या व्यक्तीने आरोपी जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा या आरोपीचे नाव घेऊन १० कोटींची खंडणी मागितली आहे. कॉल करणाऱ्या व्यक्तीने तो जयेश कांथा उर्फ जयेश पुजारी बोलत असल्याचा दावा केला असला तरी धमकी देणारी व्यक्ती कोण आणि त्याने कोठून हे कॉल केले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त राहुल मदने, गुन्हे शाखेचे अधिकारी, एटीएसचे अधिकारी गडकरींच्या कार्यालयात पोहोचले. पोलिसांनी फोन उचलणाऱ्या गडकरींच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला फोनबाबत सखोल चौकशी करून तपास सुरु केला आहे. गडकरींच्या विरुद्ध सोशल मिडियवर पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी सायबर पोलिसात तक्रार करण्यात येणार होती. त्यानंतर धमकीचे फोन आल्यामुळे पोलिसांमध्ये आणखीनच खळबळ उडाली आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos