महत्वाच्या बातम्या

 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन द्या : आ. किशोर जोरगेवार


- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांना मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जीर्णावस्थेत असलेल्या चंद्रपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची प्रशासकीय इमारत,वर्गखोल्या, कार्यशाळा, समुपदेशन केंद्र, आणि वसतिगृहाचे नव्याने बांधकाम करण्याकरीता १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांना केली आहे. सदर मागणीचे निवेदनही आमदार किशोर जोरगेवार यांनी ना. लोढा यांना दिले आहे.

वन अकादमी येथे इंडस्ट्रीय एक्पो अॅंड बिझनेस काॅक्लेव्ह चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा हे चंद्रपूर दौ-यावर होते. यावेळी सदर निवेदन देत आमदार किशोर जोरगेवार यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.

चंद्रपूर येथे विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण मिळण्यासाठी १९६३ ला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची सुरुवात करण्यात आली. सद्यस्थितीती चंद्रपूर येथे ११ एकर च्या परिसरात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत असून २२ ट्रेड मिळून ५१ युनिट मध्ये सुमारे ११०० विद्यार्थी नवीन तंत्रज्ञानयुक्त औद्योगिक प्रशिक्षण घेण्यासाठी येथे येत असतात. असे असतांना मागील ६० वर्षाच्या काळात येथे अपेक्षित असे काम केल्या गेलेले नाही. परिणामी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची प्रशासकीय इमारत व वर्गखोल्या, कार्यशाळा व समुपदेशन केंद्र जीर्ण झाले असल्याने प्रशासकीय कामकाजात तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यातच विद्यार्थ्यांचे वसतिगृह निर्लेखित करण्यात येत असल्याने बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना निवासाची सोय उपलब्ध नाही. तसेच केंद्रातील क्रीडांगण दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

अद्ययावत तंत्रज्ञान, सोयीसुविधा, विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि जीर्ण इमारतीमुळे सुरक्षतेच्या दृष्टीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे प्रशासकीय इमारती आणि वर्गखोल्या, कार्यशाळा आणि समुपदेशन केंद्राचे नव्याने बांधकाम करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेता येथे सुसज्ज, प्रशस्त व अद्ययावत सोयी सुविधा युक्त प्रशासकीय इमारत व वर्गखोल्या, कार्यशाळा आणि समुपदेशन केंद्र, वसतिगृह व क्रीडांगण बांधकाम करण्यासाठी एकत्रित १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. 

  Print


News - Chandrapur
Related Photos