महत्वाच्या बातम्या

 ५३ गोवंशीय जनावरांची सुटका, २२.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त : माजरी पोलिसांची कारवाई 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : पोलीस स्टेशन माजरी हद्दीत गोवंशाची अमानुष व अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध माजरी पोलिसांनी धडक कारवाई करत ५३ गोवंशीय जनावरांची सुटका केली असून २२ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे गोवंश तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १२ मे २०२६ रोजी सकाळच्या सुमारास पोलीस स्टेशन माजरी येथील सफौ रमेश तुराणकर व पोलीस अंमलदार उमेश उईके हे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, नागपूरकडून येणाऱ्या एका कंटेनरमधून गोवंशीय जनावरांची अवैध तस्करी करण्यात येत आहे.

या माहितीच्या आधारे माजरी पोलिसांनी वरोरा-वणी महामार्गावरील कुचना परिसरात नाकाबंदी केली. दरम्यान, संशयित कंटेनर क्रमांक डीडी ०३ आर ९८४० यास थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन न थांबविता यू-टर्न घेत नागपूरच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी तत्काळ पाठलाग केला असता चालकाने कंटेनर रस्त्यावर उभा करून घटनास्थळावरून फरार झाला.

यानंतर पोलिसांनी कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये ५३ गोवंशीय जनावरे - बैल, गायी व गोरे - अत्यंत अमानुष पद्धतीने कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ जनावरांची सुटका करून वाहन ताब्यात घेतले.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन माजरी येथे प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंधक कायदा १९६० चे कलम ११(१)(अ), (ड), (ई), (एफ), (आय), (एल), महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा १९७६ सुधारित २०१५ चे कलम ५(अ), ९ तसेच भारतीय न्याय संहिता कलम २८१, ४५, ३(५) व मोटार वाहन कायद्यान्वये कलम १८४, २३९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत अंदाजे ७ लाख ९५ हजार रुपये किंमतीची ५३ गोवंशीय जनावरे व १५ लाख रुपये किंमतीचा कंटेनर असा एकूण २२ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमित पांडेय यांच्या नेतृत्वात पोउपनि हरीदास चोपने, सफौ रमेश तुराणकर, ज्ञानेश कोटरंगे, रविंद्र किन्नाके, उमेश उईके व दिलीप मंडल यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.





  Print






News - Chandrapur




Related Photos