चंद्रपूर : बदलणार मनपा शाळांचा चेहरा मोहरा
- भौतिक सुविधा देण्याचे आयुक्तांचे निर्देश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा सातत्याने उंचावत असुन विद्यार्थ्यांची वाढती पटसंख्या पाहता सर्व मनपा शाळांना उत्तम भौतिक सुविधा देण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी दिले आहेत.
मंगळवार १८ एप्रिल रोजी झालेल्या शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत आयुक्त यांनी मनपा शाळेतील सोयी सुविधांचा आढावा घेतला. शहरात मनपाच्या २७ शाळा आहेत. यातील पंडित नेहरू प्रा.शाळा, इंदिरा नगर, भारतरत्न डाॅ.भिमराव आंबेडकर प्रा.शाळा, आंबेडकर नगर, रैयतवारी काॅलरी मराठी प्रा.शाळा, बंगाली कॅम्प, लोकमान्य टिळक कन्या शाळा, पठाणपूरा रोड या ४ शाळांची इमारत जीर्ण झाली असल्याने त्या पाडून नव्याने बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच सावित्रीबाई फुले उच्च प्रा.व माध्यमिक विद्यालय, बाबुपेठ, शहिद भगतसिंग प्रा.शाळा, भिवापूर, महात्मा फुले प्रा.शाळा घुटकाळा या शाळांमध्ये वर्ग खोली बांधकाम करून अत्याधूनिक सुविधा देण्यात येणार आहे. तसेच शक्य असेल तितक्या शाळेत भौतिक सुविधा देण्याचा मनपाचा प्रयत्न आहे.
ज्या शाळेत मैदान उपलब्ध आहे ते क्रीडांगण म्हणुन विकसित करणे, विद्यार्थी शारीरिक दृष्ट्या सुदृढ व निरोगी असावे, या दृष्टीने खेळण्याचे साहित्य घेणे, साहीत्य ठेवण्याच्या खोलीचे निर्माण करण्यात येणार आहेतसेच शाळेला लागुन मोकळी जागा असल्यास ती सुद्धा विकसित करण्यात येणार आहे.प्रत्येक शाळेत आधुनिक शौचालय, दिव्यांगांसाठी रॅम्प, भिंतींचे कुंपण, प्रत्येक वर्गात ई - लर्निंगसाठी अत्याधुनिक संगणक व प्रोजेक्टर्स, आधुनिक पद्धतीचे डेस्क बेंच, टाईल्स, दरवाजे,खिडक्या, रंगरंगोटी, फॅन, इलेक्ट्रिक सप्लाय, लहान मुलांसाठी आकर्षक खेळण्याचे साहीत्य, ग्रीन मॅट, सीसीटीव्ही, डिजिटल लॅब - लायब्ररी, वॉटर कूलर्स, चित्र सजावट यासाठी येत्या १५ दिवसात प्रक्रिया राबविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
आयुक्त विपीन पालीवाल, उपायुक्त अशोक गराटे यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी नागेश नित यांनी गुणवत्तापुर्ण शिक्षण, शिक्षणाचा दर्जा, शाळेची परिस्थिती, दृष्टीकोन यात आमुलाग्र बदल केला आहे. दर्जा वाढविण्यास प्रयत्न केल्याने वर्गात मुलांच्या लक्षणीय उपस्थिती वाढली. मनपाच्या सावित्रीबाई फुले शाळेला इयत्ता १० वी पर्यंत मान्यता मिळाली असुन या शाळेतील डिजिटल वर्गाचे मुख्यमंत्री यांनी कौतुक केले होते.
आज चंद्रपूर मनपा शाळांत दिले जाणारे शिक्षण व सुविधा यांचा दर्जा चांगला आहे मात्र आधी ही स्थिती नव्हती, खाजगी शाळेच्या तुलनेत विशेष सुविधा नव्हत्या त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती खालावली होती. २०१५ मध्ये महापालिकेच्या शाळांमध्ये असलेल्या २ हजार २७० विद्यार्थ्यांची संख्या ४ हजार ७० वर पोहचली असुन मनपा शिक्षकगण यांनी घेतलेले प्रयत्न आणि मनपा प्रशासनाने दिलेल्या प्रोत्साहनाने शिक्षणाचा दर्जा वाढविण्यास मदत होत आहे.
आढावा बैठकीस उपायुक्त अशोक गराटे, सहायक आयुक्त विद्या पाटील, उपअभियंता अनिल घुमडे, रवींद्र हजारे, मनपा शिक्षणाधिकारी नागेश नित तसेच मनपा शाळांचे मुख्याध्यापक उपस्थीत होते.
News - Chandrapur